। चिपळूण । वार्ताहर ।
एसव्हीजेसीटीच्या क्रीडासंकुलात आठव्या डेरवण यूथ गेम्स महोत्सवांतर्गत ज्या हॉलीबॉल स्पर्धेच्या चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात केदारनाथ प्रसन्न ( सावर्डे – चिपळून ) या संघाने देवगाव स्पायकर संघावर विजय मिळवत हॉलीबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. विजय संघातर्फे आदित्य प्रभुलकर, नवमन पटेल, हर्ष बोरकर यांनी सांघिक ताळमेळ दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली. उपविजयी संघातर्फे विनय साळुंखे याची एकाकी लढत संघास पराभवापासुन वाचवू शकली नाही.
मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत पुण्याच्या मिलेनियम नॅशनल स्कूलच्या ‘बी’ टीमने आपल्याच शाळेच्या ‘ए’ टीमबरोबर झालेल्या सामन्यात 2-1 असा विजय मिळवत स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले. या सामन्यात श्रीया गोठोस्कर, रिया ऐदलाबादकर यांनी जोरदार स्मॅशिंग केले. उपविजयी संघाच्या नंदिनी भागवतची लढत मात्र एकाकी ठरली. स्वदेशी खेळांचे संर्वधन होण्याकरिता लंगडी या देशी खेळाचा या स्पर्धेत समावेश करण्यात आलेला आहे. 12 वर्षांखालील मुले-मुलींच्या गटात ही स्पर्धा खेळविली जात आहे. राज्यातून मुंबई, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर आदी जिल्ह्यातून शंभरहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. पेडणेकर स्कूल, तळवडे आणि सु. दा. गद्रे स्कूल, चिपळूण यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात पेडणेकर स्कूलने एक डाव 23 गुणांच्या फरकाने विजय मिळवत स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले.