महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी केले आंदोलन
। मुंबई । दिलीप जाधव ।
राज्याचे अल्पसंख्याक खात्याचे मंत्री नवाब मलिक यांना सक्त वसुली खात्याच्या अधिकार्यांनी काही ही सूचना न देता अटक केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री आणि आमदार व कार्यकर्त्यांनी मंत्रालाय जवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ आंदोलन केले. “नवाब मलिक जिंदाबाद… ईडी मुर्दाबाद… मोदी सरकार हाय हाय… महाराष्ट्र लढेगा मोदी हारेगा… महाराष्ट्र ना कधी दिल्लीसमोर झुकला ना कधी झुकणार… आवाज कुणाचा महाविकास आघाडीचा” अशा जोरदार घोषणा व फलक फडकावत महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी आणि पदाधिकार्यांनी व हजारो कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी पुतळा परिसर दणाणून सोडला.
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई केलेली आहे. केंद्र सरकारच्या ह्या दडपशाहीविरोधात आघाडी एकत्र लढा देत असल्याचे सरकार मधील मंत्र्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या . भाजपाला नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्याचा आणि आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्याच्या मुलाने शेतक-यांना गाडीखाली चिरडले त्या केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी भाजपने आंदोलन केले पाहिजे.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की 20 वर्षापूर्वीच्या एका प्रकरणाशी काहीतरी करुन धागेदारे जुळवण्याचा प्रयत्न करुन नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधातील लढ्यात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीसोबत खंबीरपणे उभा आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा मागणार्यांनी त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यावर कारवाई झाली तेव्हा त्यांनी राजीनामे दिले होते काय? याचे आधी उत्तर द्यावे. ज्यांच्या मुलाने शेतकर्यांना गाडीखाली चिरडले त्या केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी भाजपने आंदोलन केले पाहिजे.
सार्वजिनक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, मंत्री नवाब मलिक यांच्यावर केलेली कारवाई ही राजकीय सुडबुद्धीने केलेली असून हे अत्यंत खालच्या पातळीवरचे राजकारण देशात सुरु झाले आहे. मंत्र्याला अशा पद्धतीने अटक करणे लोकशाहीला मारक आहे. केवळ संशयाच्या आधारावर ही कारवाई केलेली असून हा चुकीचा पायंडा पाडला जातोय. या आंदोलनाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, माजी खासदार हुसेन दलवाई तसेच महाविकास आघाडी सरकार मधील आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.