पनवेलमार्गे मुंबई महानगराला हरित ऊर्जा

। रायगड । प्रतिनिधी ।

मुंबई महानगरात दोन हजार मेगावॅट वीज उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड लवकरच साकारत आहे. पनवेल तालुक्यातील 17 गावांतून हा प्रकल्प मुंबईच्या दिशेने जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणारी वीज ही हरित ऊर्जा प्रकाराची असल्याने ग्राहकांच्या खिशावरचा भार काही प्रमाणात हलका होणार आहे. गुजरात राज्यातील कच्छमधल्या दोदरा येथे सौरऊर्जा आणि पवन ऊर्जेच्या माध्यमातून निर्माण केली जाणारी वीज मुंबई महानगर प्रदेशाकरिता आणण्याचा उपक्रम ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे.

हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साधारणत दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. वाढलेली विजेची मागणी लक्षात घेता सध्या कार्यान्वित असलेल्या अतिउच्च दाबाच्या वीजवाहिन्या वीज पारेषण करण्यासाठी पुरेशा सक्षम नाहीत. साधारणतः पाच ते सहा दशकांपूर्वी उभारलेले हे वीजवाहिन्यांचे जाळे, दिवसेंदिवस वाढत जाणारी विजेची मागणी त्यामुळे अतिरिक्त वीज आणण्यासाठी या वीजवाहिन्या प्रभावी ठरत नाहीत. यासाठी अतिउच्च दाब वीजवाहिन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात तयार करणे ही आता वीज कंपन्यांपुढे मोठी गरज बनली आहे. विजेची वाढती मागणी लक्षात घेता, सरकारकडून विविध उपक्रम राबवण्यात येत असून त्यापैकी हरित ऊर्जा निर्मिती व वापराला प्राधान्य दिले जात आहे.

गुजरात-पालघर-भिवंडीमार्गे पनवेल
गुजरातमधून येणारी ऊर्जा वहिनी पालघर, भिवंडी, अंबरनाथ तालुक्यातून पनवेल तालुक्यात प्रवेश करत आहे. पनवेल तालुक्यात टाकण्यात येणार्‍या एकूण तारांची लांबी 26.5 किलोमीटर आहे. पनवेल तालुक्यातील 17 गावांमधून ही वाहिनी पुढे खारघर केंद्रामध्ये पोहोचते. तालुक्यातील 950 भूधारकांना टॉवर आणि तारांखालचे एकत्रित क्षेत्रासाठी समाधानकारक परतावा देण्यात आला.

मुंबई महानगर प्रदेश झपाट्याने विकसित होत आहे. अखंडित वीजपरवठा ही सुनियोजित विकासाची सगळ्यात पहिली गरज आहे. ज्या प्रमाणात या प्रदेशाचा विकास होतो आहे, ते पाहता येत्या काळात अतिरिक्त विजेची गरज भासणार आहे. सध्याच्या पारेषण प्रणालीमध्ये नव्या अतिउच्च दाब वाहिन्यांची नितांत गरज आहे. त्यामुळे नियोजित प्रकल्पांच्या माध्यमातून अतिरिक्त वीज वाहिन्या उभारून भविष्यात विजेचा हा तुटवडा भरून काढणे सोपे होणार आहे.

डॉ. संजीव कुमार,
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,
महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण
Exit mobile version