। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते स्व. अॅड दत्ता पाटील यांची पुण्यतिथीनिमित्त रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी स्व. दादांना विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन आदरांजली अर्पण करण्यात आली. अलिबाग येथील शेतकरी भवन येथे शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी स्व. दत्ता पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन करुन आदराजंली अर्पण केली. यावेळी शेकापचे जिल्हा कार्यालयीन चिटणीस तथा अलिबाग नगरपरिषदेतील शेकापचे गटनेते प्रदीप नाईक, यांच्यासह शेकापक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. पेझारी, पोयनाड येथे तसेच खारेपाट विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल, खालापूर, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, मुरुड, रोहा, सुधागड, माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर अशा जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी दत्ता पाटील यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.