। नेरळ । प्रतिनिधी ।
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कर्जत तालुक्यात अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा हालिवली येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हालीवली जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र म्हात्रे यांच्या संकल्पनेतून जयंती उत्सवाचे आयोजन केले होते. सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शिंदे आणि रामदास बोराडे यांच्या सहकार्याने शालेय विद्यार्थी सह गावातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची पालखीमधून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रामदास बोराडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. काशिनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील माहिती सांगितली. शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र म्हात्रे यांनी संभाजीराजे यांच्याविषयी सांगताना त्यांचे पराक्रम, शौर्य याचे अनेक किस्से मुलाना सांगितले. संभाजीराजांचा इतिहास ऐकताना विद्यार्थी इतिहासात रमलेले पहायला मिळाले.
दरम्यान स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या जन्मोत्सव पालखी सोहळा आयोजित करण्यासाठी भूषण राणे, प्रमिला दिनकर, वंदना बोराडे, मनिषा बोराडे, अर्चना शिंदे, दर्शना बोराडे तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी यांचा सहभाग होता. शाळेमध्ये छत्रपती संभाजीराजे जयंती साजरी करणारी पहिलीच शाळा असल्याचे बोलले जात असल्याने शाळेचे आणि आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सकाळी संभाजी ब्रिगेडकडून कर्जत दहीवली येथील चौकात असलेल्या संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.