अभ्यासपर्वातून महामानवास अभिवादन

सलग 4 दिवस 8 तास अभ्यास; जेएसएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीदिनानिमित्त दि. 14 एप्रिल रोजी जे.एस.एम. महाविद्यालयात स.10 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीपासून ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत प्रतिदिन 8 तास असे 4 दिवस अभ्यासपर्व उपक्रमाचे आयोजन यानिमित्ताने महाविद्यालयाच्या ग्रंथालयात यावेळी करण्यात आले होते. सलग चार दिवस राबविलेल्या या उपक्रमामध्ये एकूण 250 हून अधिक विद्यार्थ्यांनी दररोज 8 तास वाचन करून आपला सहभाग नोंदविला.

सदर उपक्रमाची सांगता जनता शिक्षण मंडळ, अलिबागचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिन कार्यक्रमाने झाली. यावेळी अध्यक्ष गौतम पाटील यांनी डॉ. बाबासाहेब यांचे देशाच्या जडणघडणीतील योगदानाबद्दल, तसेच बाबासाहेबांनी ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश विद्यार्थ्यांना का दिला याबद्दल अतिशय समर्पक असे मार्गदर्शन केले. नारायण नागू पाटील यांचा वारसा घेऊन लोकनेते अ‍ॅड. दत्ता पाटील यांनी शिक्षणाची गंगा जिल्ह्यात गावागावात पोहोचवली. त्याच ध्येयाने विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच संविधानाविषयी विद्यार्थ्यांना अधिक माहिती मिळावी याकरिता दिल्ली येथील प्रधानमंत्री राष्ट्रीय संग्रहालय येथे सहलीचे आयोजन करावे, असा मानसदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रा. डॉ. अनिल पाटील यांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या बाबासाहेबांच्या संदेशाबद्दल तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा, पत्रकारिता, समाजकारण, अर्थकारण देशाच्या संविधान निर्मितीतील त्यांचे योगदान यावर प्रकाश टाकला. जगामध्ये डॉ. बाबासाहेबांना ’ज्ञानाचे प्रतीक’ म्हणून ओळखले जाते याविषयीचा उहापोह त्यांनी यावेळी केला. जयंतीच्या निमित्ताने प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. ईश्‍वर  कोकणे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी देशातील प्रत्येक घटकांना शिक्षण मिळावे यासाठी पुण्यामध्ये 1848 मध्ये मुलींच्या शाळेच्या निर्मितीपासून ते आयुष्यभर केलेले कार्य ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गोलमेज परिषदेतील प्रतिनिधित्व, जातीय निवाड्यातील स्वतंत्र मतदार संघाची मागणी पदरात पाडून घेणे, अस्पृश्यता नष्ट करण्यामागील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवतावादी दृष्टिकोन उलगडत असताना गुरुशिष्याची जयंती एकत्र साजरी होत आहे यासाठी समाधान व्यक्त केले.

अभ्यासपर्व उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे ग्रंथालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना विभाग, सांस्कृतिक कार्यक्रम विभाग आणि डी.एल.एल.ई. विभागाद्वारे संयुक्तपणे करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी. बी. आचार्य यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सुबोध डहाके ग्रंथपाल यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. डॉ. सोनाली पाटील, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. पी. डी. दातार,  राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पी.बी. गायकवाड, प्रा. डॉ. सुनील आनंद, राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख प्रा. डॉ. मोहसीन खान,  प्रबंधक श्री. गीते, डीएलएलइ प्रमुख प्रा. गौरी लोणकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, उपक्रमात सहभागी विद्यार्थी तसेच समाज कल्याण वस्तिगृहाच्या अधीक्षक सौ. गुजेला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विविध ग्रंथसंपदेचे पुस्तक प्रदर्शनही महाविद्यालयाच्या ग्रंथालयात भरविण्यात आले होते. तसेच सकाळी 7 वा. समाज कल्याण, रायगड द्वारा आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते अलिबाग बीचपर्यंत निघालेल्या पदयात्रेत महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Exit mobile version