| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील चिरनेरच्या ऐतिहासिक शौर्यभूमीत कातळपाडा येथील दत्त मंदिराच्या प्रांगणात छावा प्रतिष्ठानतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती उत्सव सोहळा मंगळवारी 14 मे रोजी ऐतिहासिक वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सकाळी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म सोहळा, पाळणा गीत तसेच छत्रपती शंभुराजांच्या प्रतिमेचे पूजन व शंभूराजांना अभिवादन करण्यात आले. ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती रेवसकर यांच्या हस्ते शंभूराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रसिद्ध गायिका सुजाता गोंधळी यांच्या पाळणा गीताला सुरावटी लाभल्या. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या सत्यनारायणाच्या महापूजेचा मान सरिता योगेश खारपाटील यांना देण्यात आला होता.
त्यानंतर सायंकाळी शंभू राजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भगवी टोपी घातलेले तरुण-तरुणी, नऊवारीतील तरुणी व महिला फुलांची उधळण करताना दिसत होत्या. टाळ मृदुंगाच्या साथीत, अवघा आसमंत दुमदुमून टाकणारा छत्रपती संभाजी महाराज की जयचा, जयघोष अशा ऐतिहासिक वातावरणात निघालेल्या मिरवणुकीत चिरनेर गावातील अनेक तरुण, तरुणी व महिला विविध वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, आणि जय भवानीच्या जय घोषामुळे चिरनेर गावातील वातावरण प्रसन्न होऊन, शिवमय झाले होते. गावातील लेझीम पथकातील मुलींनी नऊवारीची वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सामील होऊन, शिवमय झाले होते. गावातील लेझीम पथकातील मुलींनी नऊवारीची वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सामील होऊन, लेझीमची सुंदर अशी अदाकारी सादर केली. अश्व नृत्याचा थरारही पाहायला मिळाला. अभंग, पोवाडा आणि श्लोकांच्या सुरावटीत ही मिरवणूक मार्गस्थ लागली.
यावेळी रांजणपाडा येथील शिव चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही मानवंदना देण्यात आली. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तानाजी, सूर्याजी, जिजाबाई, येसूबाई, सोयराबाई, पुतळाबाई व मावळे अशी वेशभूषा परिधान केलेली गावातील मुले व मुली सर्वांचेच विशेष लक्ष वेधून घेत होती. या सर्व ऐतिहासिक वातावरणामुळे चिरनेर गावात जणू शिवसृष्टी अवतरली होती. या पालखी मिरवणुकीत शिवप्रेमीं बरोबर ग्रामस्थ तसेच हभप गणपत महाराज, हभप हासूराम बाबा महाराज यांच्या अध्यात्मिक पौर्णिमा मंडळाचे वारकरी, छावा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, माऊली हॉर्स फार्मचे प्रशांत घरत, हरिश्चंद्र गोंधळी बुवा, कमलाकर पाटील सहभागी झाले होते. रात्री आठ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या महाप्रसादासाठी अन्नदाते तेजस डाकी यांचे सौजन्य लाभले. रात्री दहा वाजता बळवली येथील ह भ प अमित महाराज यांचे शंभूराजांच्या जीवनपटावर कीर्तन सादर झाले. कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिवसभरात हजेरी लावून छत्रपती शंभूराजांना मानाचा मुजरा केला. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत संस्थापक अध्यक्ष अँड सुभाष कडू आणि अन्य कार्यकर्त्यांनी केले.