। पेझारी । वार्ताहर ।
मुरब्बी राजकारणी, उत्तम प्रशासकीय कौशल्य, उत्कृष्ट संघटन कौशल्य, जनहिताचा अचूक निर्णय घेण्याची हातोटी, कला-क्रीडा व साहित्य क्षेत्रामध्ये अग्रेसर राहिलेले, सर्वसामान्य जनतेच्या उत्कर्षाचा अखंड विचार करणारे असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व स्वर्गीय प्रभाकर पाटील तथा भाऊ यांचा 22वा पुण्यस्मरण दिन कोएसो ना.ना. पाटील संकुलामध्ये भावपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला.
यावेळी राजकारणातून समाजकारण हा स्वर्गीय प्रभाकर पाटील यांनी घालून दिलेला वसा आणि वारसा समर्थपणे सांभाळणारे पाटील कुटुंबीय आ. जयंत पाटील, ज्येष्ठ कन्या मीनाक्षी पाटील, माजी आ. पंडित पाटील, स्नुषा कल्पना पाटील, भावना पाटील, नातसून चित्रा पाटील तसेच पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, माजी रा.जि.प. सदस्य शंकरराव म्हात्रे, भाऊंचे चाहते, स्नेही, पोयनाड गणातील राजकीय, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर म्हात्रे, सुनील राऊत, प्रकाश म्हात्रे, बाळाराम दांडेकर, यशवंत गुरुजी, स्वप्नील पाटील संकुल प्रमुख के.के. फडतरे, प्रा. दिलीप पाटील, संकुलातील सर्व शाखांचे प्रमुख, सत्र प्रमुख, सर्व शाखांमधील आजी-माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सर्व उपस्थितांनी व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाऊंच्या स्मारकातील अर्धाकृती पुतळ्यास मनोभावे अभिवादन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एन.सी.सी. पथकातील विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. त्यानंतर शाळेच्या माजी शिक्षिका स्व. मेघा पाटील लिखित भाऊंच्या कार्यकर्तृत्वावर आधारित काव्य, संगीत शिक्षक राजेंद्र म्हात्रे व प्रकाश गोलीपकर यांनी स्वरबद्ध करून सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली पाटील यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी देवेंद्र पाटील, एस.के. पाटील, व्ही.डी. पाटील, तृप्ती पिळवणकर, समाधान भंडारे, निनाद पाटील, सुवर्णा पाटील व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.