भिवंडी | प्रतिनिधी |
ठाणे जिल्हा कबड्डी असो. ने उजाळा क्रीडा मंडळाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या 66व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या कुमार गटात ग्रिफिन जिमखाना, कुमारी गटात ज्ञानशक्ती युवा, तर व्यावसायिक पुरुष गटात जॉयकुमार युवा प्रतिष्ठान यांनी जेतेपद पटकाविले. वळगांव-भिवंडी येथील स्व. जाईबाई काशिनाथ पाटील क्रीडानगरित संपन्न झालेल्या कुमार गटाच्या अंतिम सामन्यात ग्रिफिन जिम.ने जय बजरंग मंडळाचा कडवा प्रतिकार 5-5 चढायांच्या डावात 41-35(9-3) असा मोडून काढत विजेतेपदाच्या चषकावर आपले नाव कोरले. पहिल्या डावात 16-13अशी आघाडी घेणार्या ग्रिफिनला दुसर्या डावात जय बजरंगने 32-32 असे बरोबरीत रोखले. यामुळे निर्णायक निकाल लावण्याकरिता 5-5 चढायांचा डाव खेळविण्यात आला. त्यात ग्रिफिनने 9-3 अशी बाजी मारली. मोहन पुजारी, रोहन तुपारी ग्रिफिनकडून, तर निखिल भोईर, आशिष पाटोळे जय बजरंगकडून उत्कृष्ट खेळले.
कुमारी गटाच्या अंतिम सामन्यात ज्ञानशक्ती युवाने राजर्षी शाहू महाराज संघाला 38-28 असे रोखत विजेतेपदाला गवसणी घातली. मध्यांतराला 16-13 अशी आघाडी घेणार्या ज्ञानशक्तीने नंतरही तोच जोश कायम ठेवत हा विजय साकारला. यतीक्षा बाबडे, निधी राजोळे, मानसी गायकर, मनीषा गायकवाड या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. राजर्षी शाहूकडून साधना यादव, ज्योती विश्वकर्मा, सिमरन सोनार उत्तम खेळल्या. व्यावसायिक पुरुषांच्या अंतिम सामन्यात जॉयकुमार युवा प्रतिष्ठानने प्रिन्सकुमार अँड कंपनीला 31-17 असे नमवित या विभागात जेतेपदाचा मुकुट हस्तगत केला. राकेश पाटील, प्रणय राजपूत, अभिषेक भोईर यांच्या चतुरस्त्र खेळाच्या बळावर विश्रांतीला 18-09 अशी आघाडी घेतली. विश्रांतीनंतर तोच खेळ कायम राखत हा विजय मिळविला. निखिल जोशी, रोहित पाटील प्रिन्सकुमारकडून उत्तम खेळले.