अल्पवयीन मुलगी बाधीत असल्याचे आशा सेविकेने केले उघड
| म्हसळा | वार्ताहर |
तालुक्यातील कोळे आदिवासी वाडीत अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याची आणि बाधीत असल्याची घटना घडली आहे. या घटनेची अधिक माहिती घेतली असता तळवडे उपकेंद्राच्या आरोग्य सेविका मनिषा लोंढे यानी म्हसळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलीसानी गुन्हा नोंद केला आहे. या घटनेत 20 वर्षाच्या नवरदेव आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही केवळ साडे चौदा वर्षाची असल्याचे सांगण्यात आले. आशा सेविकांच्या तपासणी अहवालात पिडीत मुलीने तिच्या अडचणी सांगितल्या नंतर हा प्रकार आरोग्य विभागाच्या लक्षात आला. संबंधितांनी सोमवारी दि.2 जून रोजी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातल्याचे सूत्रांनी सांगितले. आशा सेविकेच्या माध्यमातून पीडीत मुलीची तपासणी करण्यात आली असता पिडीत अल्पवयीन मुलगी बाधीत आसल्याचे खात्री करण्यात आली. म्हसळा बालविकास प्रकल्प अधिकारी यानी मुलामुलींच्या नातेवाईकांना अल्पवयात विवाह केल्याने काय परिणाम होतात याबद्दलची माहिती देणे कर्तव्य भावनेतून आवश्यक होते. परंतु, प्रभारी प्रकल्पाधिकारी यानी त्यांचे कर्तव्यात कसूर केल्याने. अल्पवयीन मुलीला प्रथम शारीरीक संबध, नंतर विवाह आणि आता कुपोषणापर्यंतच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. म्हसळा तालुका बालविकास प्रकल्पाधिकारी पद गेले 3 वर्ष 8 महीने रिक्त असल्याने तालुक्यात अशा प्रकारात पर्यवेक्षिका प्रकल्पाधिकारी यांचा कार्यभार कसा काय स्विकारतात हा चर्चेचा विषय झाला आहे. ऐन अधिवेशनाच्या तोंडावर ही घटना घडल्याने चर्चेला उधाण आले आहे.






