। उरण । वार्ताहर ।
उरण येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर फुंडे विद्यालयात मराठी व ग्रंथालय विभागाच्यावतीने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या समारंभाच्या निमित्ताने उरण तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते. यावेळी, पत्रकार दिनाच्या निमिताने सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. तसेच, उपस्थित पत्रकार व विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रांचे वाचन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर हे होते. त्यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. पत्रकार आपल्या लेखणीतून समकालीन घडामोडी मांडत असतात, प्रसंगी त्यावर भाष्य करतात आणि प्रस्थापित राजकारणाला आणि समाजकारणाला वेगळी दिशा देऊ शकतात. लोकशाहीमध्ये सर्व सामान्य माणसांचा विश्वास डळमळीत होणार नाही याची दक्षता फक्त पत्रकारच घेत असतात. त्यामुळे पत्रकारांचा सन्मान हा खर्या अर्थाने लोकशाहीचा सन्मान असतो, असे ठक्कर यांनी सांगितले. यावेळी, जीवन केणी, पंकज ठाकूर, मिलिंद खारपाटील, दिनेश पवार, दत्तात्रय म्हात्रे, सुर्यकांत म्हात्रे, महेश भोईर, राजकुमार भगत, सुभाष कडू व आरती सुरवसे हे उपस्थित होते.