। आगरदांडा । वार्ताहर ।
शिक्षक वर्धापन दिनाचे औचित्य साधून, परहुरपाडा येथील शिवछत्रपती क्रीडांगणावर शिक्षकांच्या भव्य क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या. येथील मुरुड रिटर्न या क्रिकेट संघाने प्रथम क्रमांकाचे विजेतेपद मिळवले. पिकनिक ग्रुप या अलिबागमधील नामांकित शिक्षक ग्रुपने शिक्षकांमधील खिलाडूवृत्ती, शारीरिक तंदुरुस्ती आणि एकोपा वाढीच्या हेतूने भव्य क्रिकेटस्पर्धा आयोजित केल्या होत्या.
यामध्ये मुरुड रिटर्न संघाने आपले वर्चस्व सिद्ध करुन प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये प्रवीण भगत उत्कृष्ट गोलंदाज ठरले. पिकनिक ग्रुपचे अध्यक्ष नरेंद्र गुरव, अलिबाग गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या हस्ते मुरुड संघाला आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मुरुडच्या शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.
यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये पिकनिक ग्रुपचे उपाध्यक्ष सुनील पाटील, महेश कवळे, जगदीश चवरकर, शुभम शिवणकर,राजेंद्र साळावकर, सुदर्शन महाडिक, गणेश नाखवा, संतोष पुकळे, चेतन पाटील, विश्वास पाटील, महेश भगत, सुनील काळे आदी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.