इको फ्रेंडली, हॅन्डमेड वस्तूंना पसंती
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीत घरगुती फराळाला अधिक मागणी असते. हा घरगुती फराळ घरपोच मिळाला तर दुधात साखरच! ऑनलाईन तसेच फेसबुक व व्हॉट्सअपद्वारे घरपोच घरगुती दिवाळी फराळ उपलब्ध होत आहे. यामुळे नोकरदार महिलांसह अनेकांची दिवाळी अगदी सुकर होणार आहे. ऑनलाईन फराळ खरेदी व विक्रीच्या ट्रेंडसोबतच इको फ्रेंडली व हॅन्डमेड भेट वस्तूंना पसंती मिळत आहे. यामुळे स्थानिक विक्रेते व महिलांना यातून नवे दालन उभे राहिले आहे.
धकाधकीच्या जिवनात सण-उत्सवाची तयारी करण्यासाठी अनेकांना वेळ नसतो. यात दिवाळीच्या फराळाची तयारी करणे म्हणजे दिव्यच झाले आहे. कित्येक वेळा चांगल्या दर्जाचा व परवडणार्या किंमतीत फराळ मिळावा यासाठी बाजारात अनेक दुकानाच्या पायर्या झिजवाव्या लागतात. परंतु, ऑनलाईन मार्केटिंगने हि समस्या मार्गी लावली आहे. फेसबुकवरील विविध पेजच्या माध्यमातून तसेच व्हॉट्सअपद्वारे घरगुती फराळ विक्री होत आहे. यामुळे एका फोनवर, व्हॉट्सअप मेसेज, एसएमएस किंवा इमेलवर घरपोच उत्तम प्रतीचा फराळ उपलब्ध होणार आहे. या खरेदीतून ग्राहकांना काही आकर्षक ऑफरदेखील मिळत आहेत. यामुळे ऑनलाईन फराळ विक्रि व खरेदी मोठ्या प्रमाणात होणार असून बुकिंगला प्रतिसाद ही चांगला मिळत आहे. इतर वस्तुंबरोबरच आता फराळानेदेखील ऑनलाईन मार्केटवर प्रभाव निर्माण केला असल्याचे दिसत आहे.
महिलांना स्वयंरोजगाराची संधी
दिवाळीनिमित्त काही संस्थानी ऑनलाईन घरपोच फराळाची सोय केली आहे. विषेश म्हणजे त्यांनी महिला बचत गट, गृहउद्योग सक्षमीकरण व महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलेले आहे. त्यांच्या मार्फत तयार केलेल्या फराळाच्या दर्जेदार वस्तू सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत घरपोच पोहचवल्या जाणार आहेत.
ऑनलाईन फराळ विक्रीला खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे. माझ्यासारख्या गृहिणीला सोशल मिडियामुळे जाहिरातीसाठी खर्च करावा लागत नाही. ऑनलाईन फराळ खरेदी करणारा ग्राहक अधिक वेळ न दवडता चटकण ऑर्डर देऊन खरेदी करतो. ग्राहकांनाही चांगल्या प्रतिचा व दर्जाचा माल उपलब्ध करुन देणार आहे. यामुळे ग्राहकदेखील समाधानी होतात. रायगड जिल्ह्यासह, ठाणे, मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून ऑर्डर येत आहेत.
– रेश्मा दुधाणे, संस्थापक, श्री स्वामी समर्थ डिलिशिअस दिवाळी स्नॅक







