रिलायन्स विरोधात वाढते असंतोष

प्रकल्पग्रस्तांचे उपोषण, आंदोलन सुरुच
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
नागोठणे येथील रिलायन्स कंपनीला सुशीक्षीत बेरोजगारांना नोकरीत सामावून घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या होत्या. परंतू कंपनी प्रशासनाने फक्त 39 जणांना सामावून घेतले. उर्वरित 200 सुशीक्षीत बेरोजगारांवर अन्याय केला असल्याचा आरोप सुरेश कोकाटे यांनी केला आहे. सुशीक्षीत बेरोजगारांना नोकरीत सामावून घ्या या मागणीसाठी कोकाटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी बेरोजगार तरुण, तरुणींचे पालकदेखील सहभागी झाले आहेत.

रिलायन्स येथील कंपनीमध्ये 240 जागांसाठी ही भरती घेण्यात आली होती. परंतू रिलायन्स कंपनीच्या प्रशासनाने फक्त 39 जणांची भरती केली. उर्वरित दोनशे बेरोजगार तरुण, तरुणींवर अन्याय केला. कंपनीत नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी स्थानिकांना प्राधान्य देणे गरजेचे असताना, प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याबाबत प्रकल्प ग्रस्त सुरेश कोकाटे यांनी तहसील कार्यालयापासून वेगवेगळ्या कार्यालयात न्यायासाठी धाव घेतली. परंतू त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कोकाटे यांनी अखेर अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला. आठ जून रोजी उपोषण सुरु करण्यात आले आहे. या उपोषणाला दोन दिवस उलटून गेले. परंतू अद्यापर्यंत कोणताही प्रकारे न्याय मिळाला नाही. बेमुदत उपोषणाची भुमिका असून न्याय मिळेपर्यंत हा लढा असणार असल्याचे सुरेश कोकाटे यांनी सांगितले.

Exit mobile version