31 डिसेंबरपर्यंत शुद्ध पाणीपुरवठा योजना पूर्ण करा
नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम दहा वर्षांनंतरही पूर्ण झाले नाही, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. आत्तापर्यंत या योजनेचे पाणी नागरिकांना घरोघरी पोचायला पाहिजे होते मात्र ते झालेले नाही. त्यामुळे आता बस्स झाले… उर्वरित कामांचा स्वतंत्र आराखडा तयार करून पाणीपुरवठा समितीला विश्वासात घेऊन योजनेचे काम 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करा, नाहीतर… अशाप्रकारे कडक शब्दांत तंबी देत पालकमंत्री अदिती तटकरे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी व ठेकेदार यांना अल्टीमेट दिले आहे.
याचवेळी नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन व सचिव भाई टके यांनी या अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी कार्यकर्ते व नागरिकांनीही अधिकारी व ठेकेदारावर तीव्र क्रोध व्यक्त केला.
नागोठण्यातील लोकांच्या जिव्हाळ्याच्या शुद्ध पाणीपुरवठा योजनेचे सद्य स्थिती व योजना लवकरात लवकर कार्यन्वित करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिका-यांबरोबर एक बैठकीचे आयोजन शनिवारी (दि.2) सायंकाळी येथील शिवगणेश सभागृहात करण्यात आले होते. यावेळी अदिती तटकरे यांच्यासह पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जैन, सचिव भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, विलास चौलकर, हरिषशेठ काळे, रियाज अधिकारी, तहसीलदार कविता जाधव, योजनेचे ठेकेदार प्रकाश देशमुख, म.जि.प्रा.चे शाखा अभियंता जे.ए. कुलकर्णी, उपअभियंता इ. डी. कोठेकर आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ना. आदितीताई तटकरे यांनी अधिकार्यांना सांगितले की, संपूर्ण लाईन व योजनेची लवकरात लवकर पुन्हा पाहणी करा, फिल्टर प्लँट, साठवण टाक्या, पंप हाऊस, अपूर्ण असलेल्या जलवाहिन्या आदी सर्व कामे पाणीपुरवठा समितीला विश्वासात घेऊन लवकरात लवकर पूर्ण कारा. 3 महिन्यांच्या आत या योजनेचे काम पूर्ण करून योजना कार्यान्वित करा. अधिकारी बदलले की, ठेकेदारांना निमित्त मिळते. त्यामुळे योजना पूर्ण होईपर्यंत कुणीही आपली बदली करू नका अन्यथा ठेकेदारासह अधिकार्यांनाही जबाबदार धरले जाईल असा इशाराही यावेळी ना. आदितीताई तटकरे यांनी दिला. ही योजना दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी अधिकारी व ठेकेदारांनी अदिती तटकरे यांना दिले.
