रत्नागिरी जिल्ह्याचे ‘पालक’, माझे मार्गदर्शक तटकरे साहेब

-शेखर निकम, आमदार, चिपळूण

सामान्य कुटुंबात जन्मलेल्या खासदार सुनील तटकरे यांनी ‘सुतारवाडी ते दिल्ली’ असा केलेला प्रवास कौतुकास्पद आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद नसताना त्यांनी या जिल्ह्याला ताकद दिली. या जिल्ह्याकडे विशेष लक्ष दिले. सुरुवातीपासूनच त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याला ताकद दिल्याने व कार्यकर्त्यांना बळ दिल्यामुळे आज रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढलेली दिसते आहे. म्हणूनच माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आज आमदार झाला आहे. त्याचे सारे श्रेय खासदार सुनील तटकरे यांनी जिल्यात केलेल्या कमला निश्चितच आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांनी या जिल्ह्याला मोठा आर्थिक निधी मिळवून दिला, त्यामुळे अनेक कामे झाली. कार्यकर्त्यांना बळ दिले, त्यामुळे ते आजही रत्नागिरीचे पालक आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ते दिल्ली असले व त्यांचा जिल्हा रायगड असला तरी त्यांचे विशेष लक्ष रत्नागिरी जिल्ह्याकडे असते.

सर्वांना सोबत घेऊन काम करणारे हे नेतृत्व आहे. कोकणासह राज्याच्या प्रश्नांची जाण असणारे हे नेतृत्व असल्याने त्यांना आजवर राष्ट्रवादीने अनेक खात्यांचे मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. अर्थमंत्री म्हणूनही त्यांनी काम करताना आपल्या कर्तृत्वाची छाप पडली. कोकणाला भरभरून दिले. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांचे नियमित सहकार्य लाभले आहे. सुनिल तटकरे हे एक असे राजकारणी आहेत ज्यांना नेहमीच समाजातील सर्व घटकांसोबत विकास साधायचा आहे. आता ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वपूर्ण व्यक्ती म्हणून गणले जातात. त्यांची राजकीय कारकीर्द ही अतिशय वेगळी आणि अनुभवसंपन्न अशी आहे. आजपर्यंत त्यांनी वेगवेगळी मंत्री पदे, समित्यांचे सदस्यत्व, व अनेक सामाजिक संस्थांचे अध्यक्षपद भूषवलं आहे. श्री. तटकरे हे नेहमीच समाज आणि देशाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील राहिले आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात दोन दशकांहून अधिक काळ काम करताना त्यांनी प्रशासन,शिक्षण, विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, खेळ अशा विविध विभागांसाठी कार्य केले आहे. मंत्रीपद भूषवत असताना त्यांचे प्राधान्य नेहमीच ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला राहिले आहे. त्यांचा विचारी स्वभाव, कुशल नेतृत्व व सामाजिक भान ह्यामुळे त्यांनी केलेली कामे नेहमी लोकाभिमुख राहिली आहेत.

श्री. तटकरे यांनी विविध क्षेत्रांमध्ये आणि वेगवेगळ्या घटकातील लोकांमध्ये स्वतःचा ठसा उमटवला आहे. ते कोकणासारख्या आर्थिकदृष्ट्या मागास विभागांमध्ये शिक्षणाचे महत्त्व, विद्यार्थ्यांची प्रगती या गोष्टींसाठी नेहमीच आग्रही राहिले आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विविध शिक्षण संस्थांच्या प्रगतीसाठी रायगड जिल्ह्यात आणि कोकण विभागात नेहमीच प्रयत्न केले. शिक्षणासोबतच त्यांना खेळ आणि पुस्तके यांची विशेष आवड आहे. खेळ संस्कृतीचा त्यांनी नेहमीच प्रचार केला आणि त्यासाठी आधुनिक सुविधाही लोकांना उपलब्ध करून दिल्या. त्यांच्यातील अभ्यासू वृत्ती आणि दूरदृष्टी हि समाजानी आत्मसात करावी हा त्यांचा नेहमीच आग्रह राहिला आहे.

कोकणाच्या विकासासाठी त्यांनी दाखवलेली दूरदृष्टी आणि त्यांचा दृष्टीकोन हे वाखाणण्यासारखे आहेत. ते अशा सुरुवातीच्या लोकांमध्ये मोडतात ज्यांनी कोकण विभागाचा विकास पर्यटन उद्योगातून साधला जाऊ शकतो, हे योग्य वेळी ओळखले. त्यांनी कोकणातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्न केले आणि पर्यटकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून दिल्या. कोकण विभागामध्ये पर्यटन उद्योगाला आर्थिक सबलीकरण आणि राज्याचा विकास साधण्याची क्षमता आहे. त्यांनी त्यांचे बौद्धिक कौशल्य कारकिर्दीमध्ये पणास लावून कोकणाचा अशा रीतीने विकास साधला की कोकणाला जागतिक नकाशावर पर्यटकांचा स्वर्ग, असे ओळख प्राप्त झाली आहे. त्यांना कोकणी लोकांचे प्रश्न, त्यांचा साधेपणा, आणि विचार करण्याची पद्धत योग्य रीतीने माहिती आहे. त्यांच्यामध्ये कोकण विभागाचे प्रश्न निश्चित आणि अचूक पद्धतीने सोडवण्याची क्षमता आहे ज्यामुळे कोकण आणि कोकणी लोकांचा विकास होऊ शकतो.

Exit mobile version