| गुहागर | प्रतिनिधी |
तालुक्यातील कोंड कारुळ येथे मच्छीमार बंधू भगिनीसाठी समुद्री शेवाळ पालनविषयी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम रिलायन्स फाऊंडेशन, जलजीविका संस्था व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. सदर कार्यक्रमामध्ये रिलायन्स फाऊंडेशन मार्फत देण्यात येणाऱ्या सागरी हवामानाची माहिती, संभाव्य मत्स्य साठा क्षेत्र, इत्यादी माहिती देण्यात आली.
जलजीविका संस्थेमार्फत मच्छिमार बंधूंसाठी समुद्री शेवाळाचे महत्त्व, समुद्री शेवाळ संवर्धनातून व्यवसायाच्या संधी, समुद्री शेवाळाचे व्यवस्थापन, राफ्ट बांधिनीचे प्रात्यक्षिक राज पवार व श्रुष्टी सुर्वे जलजीविका यांनी दाखवले. जलजीविकेचे प्रकल्प व्यवस्थापक चिन्मय दामले यांनी समुद्री शैवाल शेतीमुळे स्थानिक समुदायासाठी रोजगार निर्माण होऊन स्थानिक पातळीवर आर्थिक प्रगती साधता येईल, असे सांगितले.
यावेळी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग, गुहागर तालुक्याचे परवाना अधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी मच्छिमार बांधवाना समुद्री शेवाळाची माहिती घेऊन आपल्या क्षमतेनुसार प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करावा. तसेच विभागाच्या अन्य योजना व पावसाळी मासेमारीचे बंदीचे महत्त्व याबाबत माहिती दिली. तसेच जास्तीत जास्त मासेमारांनी अपघात गट विमा व पोर्टलवरील नोंदणी सागरमित्रांच्या माध्यमातून करून घेण्याचे आवाहन केले. रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे यांनी मच्छिमार बंधूना समुद्री शेवाळ जोड धंदा म्हणून कसा उपयुक्त असल्याचे सांगितले. या कार्य्रक्रमास चिन्मय दामले, राज पवार, सृष्टी सुर्वे, विनायक शिंदे, सागरमित्र, सुरक्षा रक्षक तसेच रिलायन्स फाऊंडेशनचे कार्य्रक्रम सहायक गौरव जाधव व कोंड कारूळ गावातील मच्छिमार बंधू आणि भगिनी उपस्थित होते.