महिला सुरक्षा व सायबर क्राईम मार्गदर्शन

| नागोठणे | वार्ताहर |

कोएसोच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्या संकुलातील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात नागोठणे पोलीस ठाण्याच्या सहकार्याने महिला सुरक्षा व सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सापोनि सचिन कुलकर्णी हे उपस्थित होते.

सचिन कुलकर्णी यांनी विद्यार्थीनींना नेहमी सावध राहाण्याचे आव्हान केले. अनोळखी व्यक्तींबरोबर मोबाईलवर व सोशल मीडियावर काहीही शेअर करू नये. बाईकवर कोणी लिफ्ट देत असेल तर स्पष्टपणे नकार द्यावा. तसेच कोणावरही पटकन विश्वास ठेवू नये व खायला दिलेली बिस्किट व चॉकलेट घेऊ नये. सायबर फसवणूक टाळण्यासाठी आपला ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक कोणालाही शेअर करू नये. तसेच सार्वजनिक ठिकाणी ऑनलाईन व्यवहार करू नये.

याप्रसंगी विनोद पाटील यांनी मुलींना मदत करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत. आपण कोणताही अनुचित प्रकार घडला तर प्रथम आईवडिलांना सांगितले पाहिजे. हे शिक्षकांना सांगावे व नंतर आमच्याकडे तक्रार नोंदवली पाहिजे. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांनी महिलांना नेहमी राम किंवा कृष्ण संरक्षण करण्यासाठी येणार नाहीत. यासाठी आपणच खंबीर होणे ही काळाची गरज आहे. महिला विभाग प्रमुख डॉ. स्मिता चौधरी यांनी महिला कक्षामार्फत विद्यार्थीनिंना दिल्या जाणाऱ्या सुविधा विषयी माहिती सांगितली.

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांनी कार्यक्राचे प्रास्ताविक केले. त्यांनी महाविद्यालयातर्फे राबविण्यात येणारे उपक्रम या विषयी उपस्थितांना माहिती दिली. या कार्यक्रमात निबंध स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनोहर शिरसाठ यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. राणी ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमास माजी प्राचार्य डॉ. संदेश गुरव, प्रा. डॉ. विजय चव्हाण, सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version