स्पर्धा, कार्यशाळा, रॅलीतून जनजागृती
। नागोठणे । प्रतिनिधी ।
नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्याकडून नागोठणे पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या गावे, वाडी, वस्त्यांवर विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून तसेच पोलीस स्मृति दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (दि.21) सकाळी 10 ते 12 वाजण्याच्या दरम्यान विद्यार्थ्यांसाठी नागोठणे पोलीस ठाण्यात विविध उपक्रम राबविण्यात आले.
यानिमित्ताने रायगड जिल्हा परिषदेच्या चिकणी, पाटणसई, घोगरकरवाडी, वासगाव, लाव्याची वाडी, कार्ली या शाळेतील मुलांसाठी कार्यशाळा व निबंध, वक्तृत्व अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी 70 ते 80 विद्यार्थी व पाच शिक्षक उपस्थित होते. नागोठणे पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सागरी सुरक्षा संदेश, सायबर क्राईम, गुड टच, बॅट टच, अल्पवयीन विवाह व पोलीस ठाणे कार्यप्रणाली याबाबत माहिती देण्यात आली. तसेच या सर्व बाबतीत नागोठणे परिसरात जनजागृती व्हावी याकरिता नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील बाजारपेठ, कोळीवाडा, खुमाचा नाका, जोगेश्वरी मंदिर, अंगार आळी, खडक आळी या भागातून विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत सपोनि सचिन कुलकर्णी यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते.







