| माणगाव | वार्ताहर |
माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयात बुधवारी (दि.5) चालू शैक्षणिक वर्षाची पहिली जनरल पालक सभा झाली. या सभेत उपस्थित पालकांना विद्यालयात होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती, स्पर्धांतील यश आणि शालेय गुणवत्तेची माहिती देण्यात आली. तसेच माता पालक संघ, पालक शिक्षक संघ आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या विविध सदस्यांची निवड करण्यात आली.
सलग 10 वर्षे विद्यालयाचा शालान्त परीक्षेचा निकाल 100 टक्के लागत आहे. या यशाचे पालकांनी अभिनंदन केले. मुख्याध्यापक महादेव जाधव यांनी पालकांची भूमिका, राष्ट्रप्रेम, शिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास, संस्कारांचे महत्त्व, विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती परीक्षा याविषयी मार्गदर्शन केले. विद्यालयात सर्व विद्यार्थी परिसराची स्वच्छता करतात. कोठेही केरकचरा करत नाहीत. त्यामुळे त्यांना घरीही कामांची सवय लावावी. ग्रंथालयातील पुस्तके वाचावीत, पालकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची चौकशी करावी, शाळेतील विविध उपक्रमांची विद्यार्थ्यांकडून माहिती घ्यावी, असे आवाहन मुख्याध्यापकांनी पालकांना केले. शाळेतील विविध उपक्रमांविषयी शिक्षक गजानन पाटील, बाळासाहेब गायकवाड यांनी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन अजित शेडगे यांनी केले. आभार शिक्षक भरत काळे यांनी मानले.