| नागोठणे | वार्ताहर |
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी (दि.8) सर्वत्र अनेक कार्यक्रम राबविण्यात येत असतात. याचाच एक भाग म्हणून अधिवक्ता परिषद, रोहा यांच्या वतीने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मंळवारी (दि.5) धाटाव ग्रामपंचायत हद्दितील महिलांसाठी कायद्याच्या विविध विषयांवर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन यशवंत ग्रामपंचायत धाटावच्या सभागृहात करण्यात आले होते.
या मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमामध्ये अधिवक्ता परिषद रोहा यांच्याकडून महिला कायद्याच्या विविध विषयांवरील व्याख्यानांने देण्यात आली. यामध्ये अधिवक्ता परिषद रोहाच्या उपाध्यक्षा अॅड. मीरा पाटील यांनी महिलांकरिता शासकीय योजना, अॅड. मीनल मनोहर यांनी महिलांची होणारी अवैध तस्करी, अॅड. दिव्या सावंत यांनी महिलांकडून केला जाणारा कायद्याचा गैरवापर, अॅड. शितल सानप यांनी महिला सक्षमीकरण तर अॅड. अनुश्री कुंटे यांनी महिलांशी संबंधित कायदे या विषयांवर उपस्थित महिलांना संबोधित केले. कार्यक्रमास धाटाव ग्रामपंचायत हद्दितील सुमारे 90 महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. सुरेखा चव्हाण, अॅड. वैभवी शिंदे व अॅड. शुभांगी ताडकर यांनी केले.
कार्यक्रमाला धाटाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा रटाटे, अशोक मोरे, दिपक चिपळूणकर, दीपिका चिपळूणकर आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिवक्ता परिषद, रोहाच्या वकील महिलांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी धाटाव ग्रामपंचायतीचे विशेष सहकार्य मिळाले.