चिरनेर | वार्ताहर |
नाबार्ड स्थापना दिनाचे औचित्य साधून, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण सहकारी बँक, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने चिरनेर बँक शाखा अंतर्गत आर्थिक आणि डिजिटल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बँकेचे उरण तालुका निरीक्षक रुपेश म्हात्रे, चिरनेर बँकेचे शाखाधिकारी मदन कोळी, बँकेचे कॅशिअर अजित थळे, बँक क्लार्क अस्मिता उंदीरे, चंपा बचत गटाच्या कलावती केणी, चमेली बचत गटाच्या अनिता घरत, सौभाग्य बचत गटाच्या लता पाटील व संसार बचत गटाच्या मीनाक्षी पाटील, कर्मचारी व तालुक्यातील बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमात उरण तालुका निरिक्षक रुपेश म्हात्रे यांनी मनोगतामध्ये बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले असून, महिलांना सदरचे व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन आर्थिक स्वावलंबी होऊन, आपल्या कुटुंबासाठी, आर्थिक हातभार लावावा, असे मनोगत म्हात्रे यांनी व्यक्त केले. तर चिरनेर बँक शाखेचे शाखाधिकारी मदन कोळी यांनी महिलांना मार्गदर्शन करताना, बँकेचे चेअरमन जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाने बचत गटातील सलग्न महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण व अन्य उपक्रम राबविले असून, महिलांनी या संधीचा अधिकाधिक लाभ घेऊन, व्यवसाय सुरु करावेत व्यवसायासाठी लागणारे आर्थिक सहाय्य आमच्या बँकेकडून उपलब्ध करण्यात येईल, असेही ते म्हणाले. होम सेव्हींग, रिकरिंग ठेव योजना कर्ज योजना आदींची माहितीही यावेळी बचत गटाच्या महिलांना देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता उंदिरे यांनी केले, तर प्रास्ताविक अजित थळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे कर्मचारी व महिला गटाच्या महिलांनी परिश्रम घेतले.