रस्ते सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता असावी

मोटार वाहन निरीक्षक सुरतकर यांचे प्रतिपादन

। नेरळ । प्रतिनिधी ।

नेरळ येथील एलएईएस स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये रस्ते सुरक्षा सप्ताहनिमित्त मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी मोटार वाहन निरीक्षक कल्याणी सुरतकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. रस्ते सुरक्षितता याला केंद्र आणि राज्य सरकार तसेच रस्ते विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडून विशेष महतव दिले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रस्ते सुरक्षितता याबाबत सजग असायला हवे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी रस्ते सुरक्षितता समजून घेऊन जागरूक नागरिक व्हावे, असे आवाहन मोटार वाहन निरीक्षक कल्याणी सुरतकर यांनी केले.

रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत एलएईएस इंग्लिश हायस्कूल, नेरळ येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांच्या मार्फत आयोजित शिबिरात शाळेच्या मुख्याध्यापिका अजिता नायर, मोटार वाहन निरीक्षक जय शेटे, मोटार वाहन निरीक्षक कल्याणी सुरतकर आदी उपस्थित होते.

यावेळी मोटार वाहन निरीक्षक कल्याणी सुरतकर यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे नियम, वाहतूक चिन्हांचे महत्त्व, हेल्मेट व सीटबेल्ट वापरण्याची आवश्यकता तसेच सुरक्षित वाहनचालना याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण झाली असून भविष्यात अपघातांचे प्रमाण कमी करण्यास हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असे मत व्यक्त केले. तर मोटार वाहन निरीक्षक जय शेटे यांनी रस्त्यावर होणारे अपघात कमी करण्यासाठी आवश्यक काळजी व उपाययोजनांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी वाहने चालवताना नियमांचे पालन करावे, विद्यार्थ्यांनी रस्त्याने चालत असताना अपघात घडल्यावर मदतीला धावून जावे, असे आवाहनही केले. शाळेच्या मुख्याध्यापिका अजिता नायर यांनी असे उपक्रम दरवर्षी शाळेत आयोजित करण्यात यावेत, अशी सूचना विभागीय परिवहन विभागाला केली.

Exit mobile version