गुजरातचा दारूण पराभव

। नवी दिल्ली । वत्तसंस्था ।

आयपीएलच्या 17व्या हंगामातील 32वा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने होते. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सवर 6 विकेट्सनी एकहाती विजय मिळवला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करायला उतरलेला गुजरातचा संघ दिल्लीच्या गोलंदाजांसमोर फलंदाजी करताना हतबल दिसला. ज्यामुळे गुजरात टायटन्सचा संघ 17.3 षटकांत 89 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने 8.5 षटकांत 4 बाद 92 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केला. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सने चेंडूच्या बाबतीत आयपीएलमधील सर्वात मोठा विजय नोंदवला.

लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली. पृथ्वी शॉ आणि जॅक फ्रेझर-मॅकगर्क यांच्यात पहिल्या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी झाली. स्पेन्सर जॉन्सनने संघाला पहिला धक्का दिला. त्यांनी मॅकगर्कची शिकार केली. त्याला दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 20 धावा करता आल्या. तर शॉ केवळ सात धावा करू शकला. या सामन्यात अभिषेक पोरेलने 15, शाई होपने 19, ऋषभ पंतने 16 आणि सुमित कुमारने 9 धावा केल्या. पंत आणि सुमित नाबाद राहिले. गुजरातकडून संदीप वारियरने दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर स्पेन्सर जॉन्सन आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Exit mobile version