| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी यूपीआय व्यवहारांवर कर आकारण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. या मुद्यावर भाष्य करताना त्यांनी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा संदर्भ दिला आहे. तसेच, पंतप्रधान मोदींनी यूपीआयवर लावलेला कर तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी (दि.16) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट शेअर करत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. व्हिडिओमध्ये त्यांनी इंदिरा गांधी यांच्या एका जुन्या विधानाचा उल्लेख केला. राहुल गांधी म्हणाले की, “एकदा इंदिराजींना विचारण्यात आले होते की त्यांचा कल नेमका कोणत्या बाजूला आहे, डावीकडे की उजवीकडे? त्यावर उत्तर देताना इंदिराजी म्हणाल्या होत्या की त्यांचा कल कोणत्याही एका बाजूला झुकलेला नसून त्यांची भूमिका थेट आणि सरळ आहे.” या संदर्भावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधी पुढे म्हणाले की, “मोदीजींची संकल्पनाच पूर्णपणे वेगळी आहे. त्यांचा कल नेहमी बदलत रहातो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर थेट लोटांगण घालून पूर्णपणे शरणागती पत्करायची, असेच त्यांनी ठरवले आहे. केंद्र सरकारने यूपीआयवर टॅक्स लावून आणि अमेरिकेला मोठा आर्थिक फायदा मिळवून देत भारतातील प्रत्येक सामान्य नागरिकावर अप्रत्यक्ष कराचा बोजा लादला आहे.” त्यामुळे देशातील कोट्यवधी जनतेवर परिणाम करणाऱ्या या निर्णयाला विरोध करत राहुल गांधी यांनी हा यूपीआय टॅक्स त्वरित रद्द करण्याची आग्रही मागणी केली आहे.





