17 हजारहून अधिक ठिकाणी प्रतिष्ठापना
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात दीड दिवसांच्या बाप्पाच्या निरोपानंतर गुरुवारी (दि.17) घरोघरी गौराईचे आगमन होणार आहे. यावेळी जिल्ह्यामध्ये 17 हजारहून अधिक ठिकाणी गौराईची विधीवत पुजा करून प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यामुळे लाडक्या गौराईच्या स्वागतासह सजावटीसाठी भक्त विशेष करून महिला सज्ज झाल्या असून, गौराईच्या पुजनाचे साहित्य खरेदीची लगबग अलिबागसह जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये बुधवारी (दि.16) दिसून आली. एक दिवसांच्या सेवेनंतर शनिवारी (दि.19) सायंकाळी सहा दिवसांच्या बाप्पासह गौराईचे विसर्जन केले जाणार आहे.
रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवाबरोबरच गौरीचे आगमन हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण म्हणून मानला जातो. यंदा गुरुवारी (दि.17) जिल्ह्यात 17 हजारहून अधिक ठिकाणी गौराईचे आगमन होणार आहे. यावेळी विधीवत पुजा करून गौराईची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यानंतर एक दिवस पुजन आणि जागरण घरोघरी होणार आहे. तसेच, वेगवेगळे धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रम व पारंपारिक नृत्यांचे सादरीकरण करून जागरण केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात गौराईच्या आगमनासाठी व पुजेसाठी लागणाऱ्या वस्तूंची दुकाने ठिकठिकाणी सजली आहे. यादरम्यान जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये मोठी धुम पहायला मिळाली. मखरे, रंगीबेरंगी फुले, विद्यूत रोषणाईची आकर्षक अशी तोरणे, पितळ, शाडू आणि फायबरचे आकर्षक मुखवटे, दागिने, 16 भाज्यांचे साहित्य, ओवसा भरण्यासाठी लागणारे मातीची गाडगी अर्थात सुगडी, पुरणपोळी करंज्यासाठीचे साहित्य, सुप अशा वेगवेगळ्या वस्तू बाजार दिसून आल्या आहेत. तसेच, बाजारपेठांमध्ये गौरीचे श्रुंगार, सजावटीच्या वस्तूंची मोठी रेलचेल पहायला मिळाली. नक्षीकाम केलेल्या आकर्षक मुखवट्यांना यंदा अधिक पसंती दर्शविली आहे. साड्या, रेडीमेड मुखवटे, गजरे, हार, फुलांची सजावट आणि पुजेचे साहित्य बाजारात दाखल झाले आहेत. गौराईच्या पारंपारिक सजावटीमध्ये साडीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे बाजारात वेगवेगळ्या रंगाच्या साड्या उपलब्ध झाल्या आहेत. बुधवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी महिलांची अलोट गर्दी दिसून आली.





