| बारामती | प्रतिनिधी |
बारामती तालुक्यातील सुपे येथील घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर, दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. बुधवारी (दि.16) सकाळी आठच्या दरम्यान हा अपघात झाला. एसटीचे वाहकही या अपघातात जखमी झाले असून, ते उपचार घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बारामती आगाराची बस पाटस (ता.दौंड) येथून विद्यार्थ्यांना घेऊन कुसेगाव, पडवी मार्गे सुपे घाटातून सुप्याकडे येत असताना घाटाच्या सुरूवातीच्या वळणावर उलटून अपघात झाला. या बसमध्ये सुमारे 40 विद्यार्थी असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. काही जखमीं विद्यार्थ्यांना केडगाव-चौफुला येथील खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. तर, दोन जणांना पुण्याला उपचारासाठी दाखल केल्याची माहिती विद्या प्रतिष्ठानच्या सुपे इंग्लिश मिडियम स्कुलचे प्राचार्य डॉ.योगेश पाटील यांनी दिली. अपघाताची माहिती कळताच घटनास्थळी पालकांसह मोठी गर्दी झाली होती.





