गुकेश पुन्हा संयुक्तपणे आघाडीवर

आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा

| टोरांटो | वृत्तसंस्था |

अझरबैजानच्या निजात अबासोवचा बचाव भेदण्याचा शानदार खेळ भारताच्या डी गुकेशने केला आणि आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेत 12 व्या फेरीनंतर पुन्हा संयुक्त आघाडी घेतली, मात्र भारताचे दुसरे आशास्थान असलेले आर. प्रज्ञानंद आणि विदित गुजराथी स्पर्धेतून बाहेर गेल्यातच जमा आहेत. संयुक्तपणे पहिल्या स्थानावर डी. गुकेशसह इयान नेपोम्नियाथी आणि हिकारू नाकामुरा असे तिघे जण प्रत्येकी 7.5 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहेत. 11 व्या फेरीअखेर नेपोम्नियाथी एकटाच पहिल्या स्थानावर होता. आता गुकेश आणि नाकामुरा यांनीही आपली दावेदारी दाखवली आहे.

17 वर्षीय गुकेश हा आव्हानवीरांच्या स्पर्धेतील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात लहान खेळाडू आहे. 1959 च्या स्पर्धेत बॉबी फिशर सर्वात लहान खेळाडू स्पर्धेत सहभागी झाला होता. अबासोवविरुद्धच्या आजच्या सामन्यात काळ्या मोहर्‍यांनी खेळणार्‍या गुकेशला विजयाची नितांत गरज होती. त्याने निमझो इंडियन बचाव पद्धतीने खेळ करून अबासोवला कोंडीत पकडले. नेपोम्नियाथी याने आजच्या 12 व्या डावात भारताच्या प्रज्ञानंदविरुद्धचा डाव बरोबरीत राखला. प्रज्ञानंद सहा गुणांसह पाचव्या, तर विदित पाच गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. आठ अव्वल खेळाडूंच्या या दुहेरी साखळी सामन्यांच्या स्पर्धेत आता केवळ दोनच डाव शिल्लक आहेत. त्यामुळे प्रज्ञानंद आणि विदित यांच्यासाठी विजेतेपद मिळवणे आता जवळपास अशक्यच आहे.

महिला विभागात चीनचे वर्चस्व कायम राहिले आहे. झ्योंगी टॅन हिने बल्गेरियाच्या कॅटरिना लागनोविरुद्धचा सामना अनिर्णित राखला. भारताच्या कोनेरू हम्पीने रशियाच्या अलेक्झांड्रा गोर्याचकिनाविरुद्धची लढत अनिर्णित सोडवली, तर प्रज्ञानंदची बहीण असलेल्या आर. वैशालीने स्पर्धेतील आपला दुसरा विजय मिळवताना युक्रेनच्या अ‍ॅना मुझीचुकचा पराभव केला. टॅनने सर्वाधिक 8 गुण मिळवून आघाडी कायम ठेवली आहे. टिंगजेई लेई ही तिच्यापेक्षा अर्ध्या गुणानेच मागे आहे. त्यामुळे महिलांमध्ये चुरस कायम आहे. पुढच्या दोन डावांत चित्र बदलू शकते.

Exit mobile version