निवडणुकीतील विजयाचा गुलाल आघाडीचाच

आ. उदय सामंत यांचा विश्‍वास
विरोधकांवर डागले टीकास्त्र

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।

जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकहाती सत्ता प्रस्थापित करेल. यामुळे या निवडणुकीतील विजयाचा गुलाल आमचाच असेल, असा विश्‍वास शिवसेना आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.
हा विश्‍वास व्यक्त करताना, जनता विरोधकांच्या खोट्या, दिखाऊ विकासाला, नाटकी वागण्याला कंटाळली असल्याचे म्हणत विरोधकांवर टीकास्त्र डागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, अतुल रावराणे, संदेश पारकर, नंदु शिंदे, मंगेश लोके, रवींद्र रावराणे, संजय चव्हाण आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
उदय सामंत म्हणले की, जनतेला अपेक्षित असणारा विकास महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारबद्दल जनतेच्या मनात आपुलकी निर्माण झालेली आहे. परंतु विरोधक फसवा विकास जनतेला दाखवित आहेत. आम्ही केलेल्या विकासकामांचे श्रेय देखील ते घेत आहेत. परंतु जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे. विकास कोण करू शकते हे आता समजले आहे. आम्ही विकास केल्यामुळे विकासाच्या मु्द्यावरच आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. परंतु ज्यांनी यापूर्वी सत्ता भोगली त्यांनी कोणताही विकास केला नाही, हे दिसत आहे, अशा भाषेत त्यांनी विरोधकांवर टीका केली.
तर जिल्ह्यातील चारही नगरपंचायतीमध्ये शिवसेना महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे. वाभवे वैभववाडीत दोन तृतींयाश जागा आम्ही जिंकणार आहोत. कुडाळ आणि दोडामार्गात देखील पूर्ण बहुमतात आम्ही असणार आहोत. देवगडात देखील बहुमताच्या जवळ आम्ही असू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
याशिवाय, केंद्रीयमंत्री नारायण राणे हे निवडणुक प्रचारात उतरल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, ते केंद्रीयमंत्री असले तरी या जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे आपला गड राखण्यासाठी ते प्रयत्न करणार हे निश्‍चित आहे. तसे करण्यात काहीच गैर नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच महाविकास आघाडीबाबत विचारले असता ते म्हणाले, ज्या-ज्या ठिकाणी शक्य होते तेथे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी झाली आहे. काही ठिकाणी झाली नसली तरी निवडणुकीनंतर निवडुन आलेले उमेदवार हे महाविकास आघाडीतच समाविष्ट होतील. प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढविण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रचारासंदर्भात चर्चा करताना, नितेश राणे हे विरोधी पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे ते माझ्याबद्दल चांगले बोलतील, अशी अपेक्षा आम्ही कधीच ठेवणार नाही. ते सातत्याने टिकाच करतील हे आम्ही गृहीत धरले असल्याचे मत सामंत यांनी व्यक्त केले. तर प्रमोद जठार हे माझे चांगले मित्र आहेत. आमच्यात चांगली मैत्री आहे. परंतु तरीदेखील ते माझ्याबद्दल चांगले बोलू शकणार नाहीत. कारण आमची मैत्री त्यांच्या पक्षातील नेत्यांना समजली तर त्यांची पक्षात अडचण होईल, असेही स्पष्टीकरण सामंत यांनी दिले.

Exit mobile version