प्रभाकर आगलावेंच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रम
| चौल | प्रतिनिधी |
चौल-भोवाळे येथील श्री गुरु दत्ताचे स्वयंभू पवित्र स्थान ओळखल्या जाणार्या दत्तमंदिरात रविवारी (दि. 21) गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. दिवसभर ‘दिगंबरा दिगंबरा’च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमला होता. गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी परिसरातून शेकडो भाविक आले होते. मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच विद्युत रोषणाईने अवघा मंदिर परिसर लखलखून निघाला होता.
गुरुपौर्णिमेनिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे मंदिराचे गुरव प्रभाकर आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. पहाटे पाच वाजता दत्त महाराजांच्या मूर्तीला अभ्यंगस्नान करण्यात आले. त्यानंतर महाआरती पार पडली. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. दुपारी 11 वाजल्यापासून महाप्रसादास प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत अन्नदानाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी परिसरातील भाविक भक्तगण व चौल पंचक्रोशितील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. सर्व भाविकांनी दत्त देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अन्नदानाचा लाभ घेतला. हा महाप्रसादाचा कार्यक्रम गेल्या 29 वर्षांपासून गुरव प्रभाकर आगलावे यांच्या पुढाकारातून अखंडित सुरू आहे. या महाप्रसादाचा लाभ आतापर्यंत हजारो दत्तभक्तांनी घेतला असून, गुरव आगलावे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. गेल्या 40 वर्षांपासून प्रभाकर आगलावे दत्तमहाराजांची निरंतर सेवा करीत असून, येणार्या भाविकांचे स्वागत करीत आहेत. दरम्यान, गुरुपौर्णिमेचा आजच्या सोहळ्यास पहाटेपासून भक्तांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. त्यामुळे मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रभाकर आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तभक्तांनी मेहनत घेतली.
