। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल येथील गावदेवी पाडा परिसरातील श्री स्वामी समर्थ मठ (मंदिर) येथे श्री गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, पनवेलसह परिसरातील मोठ्या संख्येने स्वामीभक्तांनी उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेत गुरूचरणी कृतज्ञता व्यक्त केली.
उत्सवानिमित्त पहाटे 5 वाजल्यापासून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर आरती, नामस्मरण, प्रवचन तसेच विविध धार्मिक विधी भक्तिभावाने पार पडले. दिवसभर मठ परिसरात ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अखंड गजर घुमत राहिला आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. या सोहळ्यास गुरुवर्य मठाधीपती परमपूज्य श्री 108 श्री महंत सुधाकरदासजी महाराज यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी गुरुपरंपरेचे महत्त्व विशद करत भक्तांना अध्यात्म, सेवा आणि सदाचाराचा संदेश दिला. सायंकाळी आगरी समाज हॉल, पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरण कायम राहिले.
या गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन अवधूत सुधाकर घरत आणि स्वामी समर्थ भक्त मंडळ, पनवेल यांच्या वतीने करण्यात आले. उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित भाविकांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त करत गुरुपौर्णिमेचा पवित्र उत्सव भक्तिभावाने साजरा केला.






