थंडरकॅटस एफसी संघाला विजेतेपद
| पुणे | वृत्तसंस्था |
गुरू तेगबहादुर फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित 22व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत कनिष्ठ गटात दुर्गा एफसी यांनी तर, खुल्या गटात थंडरकॅटस एफसी आणि मुलींच्या गटात अस्पायर एफसी या संघांनी विजेतेपद संपादन केले.
खडकी येथील रेंजहिल्स स्पोर्ट्स मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत कनिष्ठ गटात दुर्गा स्पोर्टस अकादमी संघाने सांगवी एफसी ब संघाचा टायब्रेकरमध्ये 5-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. निर्धारित वेळेत सामना गोल शून्य बरोबरीत सुटला व त्यामुळे सामना टायब्रेकरमध्ये खेळवण्यात आला. टायब्रेकरमध्ये दुर्गा स्पोर्टस अकादमीकडून अमन मधूरे, मयुर वाघिरे, प्रबोध भोसले, अभिषेक पाल, कृष्णा दुर्गा यांनी गोल केले. तर, सांगवी एफसी ब संघाकडून दिवेश शेवाळे याने चेंडू बाहेर मारला.
मुलींच्या गटात अंतिम लढतीत अस्पायर एफसी संघाने युकेएम कोथरूड एफसी संघाचा 2-0 असा सहज पराभव करून विजेतेपद पटकावले. विजयी संघाकडून साक्षी भुसाळकर(18मि.), पुजा गुप्ता(32मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. खुल्या गटात अंतिम फेरीत थंडरकॅटस एफसी संघाने जीओजी एफसी संघाचा 1-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. थंडरकॅटस एफसीकडून याया शेख(30मि.) याने गोल करून संघाला विजय मिळवून दिला. स्पर्धेतील जुनियर डिव्हिजन गटातील दुर्गा स्पोर्टस अकादमी संघाला करंडक व 10000रुपये, तर सांगवी एफसी ब संघाला करंडक व 8000 रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.
मुलींच्या गटातील विजेत्या संघाला करंडक व 7000रुपये आणि उपविजेत्या संघाला करंडक व 5000रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. तसेच, सुपर डिव्हिजन गटातील विजेत्या थंडरकॅटस एफसी संघाला करंडक व 15000 रुपये तर, उपविजेत्या संघाला करंडक व 10000 रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजय भंडारी, गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग सहानी, ऑल पुणे गुरुद्वारा समितीचे चेअरमन संतसिंग मोखा, पंजाबी कला केंद्रचे अध्यक्ष रजिंदरसिंग वालिया, पीडीजी लायन एमजेएफ सीए अभय शास्त्री, श्याम खंडेलवाल, सतिश राजहंस, पीडीजी लायन बीएल जोशी, बीएस राणा, लायन गिरीश गणात्रा, सरदार सुरजित सिंग राजपाल, लायन रानी अहलूवालीया, बलविंदर सिंग राणा, अमृता जगदाने, सरदार जसबिर सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. गुरू तेगबहादुर फाऊंडेशनचे अध्यक्ष एस. एस. अहलुवालिया यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.






