जिल्हा परिषदेचा शिक्षकांना सुखद धक्का; सुमारे 46 कोटी रुपयांची रक्कम केली वितरित
| रायगड | प्रतिनिधी |
शासनाकडून उशिराने मिळणारी तरतूद यामुळे शिक्षक आणि केंद्र प्रमुखांच्या पगाराला विलंब होत होता. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शासनाकडून वेतनाची तरतूद झाली. तरतूद मिळाल्यानंतर रायगड जिल्हा परिषदेने शिक्षकांना सुखद धक्का दिला आहे. महिन्याच्या 10 तारखेला होणारे वेतन 1 तारखेला बँक खात्यात जमा झाल्याने शिक्षकांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले आहे. तब्बल 46 कोटी रुपयांची रक्कम शिक्षकांच्या वेतनासाठी वितरित करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या गटशिक्षणाधिकारी, शिक्षक आणि केंद्र प्रमुखांचे वेतन करण्यासाठी शालार्थ वेतन प्रणाली आणि जिल्हा परिषद फंड मॉनेटरिंग सिस्टीमचा उपयोग केला जातो. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या सर्व्हरमधून ‘महा पे’वर लॉगिन केले जाते. महिना संपल्यानंतर शिक्षण विभाग वेतनाच्या तयारीला लागते. शिक्षकांचे वेतन बहुधा महिन्याच्या 10 तारखेपर्यंत होते. शासनाची तरतूद आली नाहीतर थोडा विलंब होतो. यामुळे शिक्षकांमध्ये वेतनाबाबत नेहमीच नाराजी असते. यावेळी मात्र शासनाची वेतनासाठीची येणारी तरतूद ऑगस्ट महिन्याच्या 22 तारखेलाच आली. यामुळे ऑगस्ट महिन्याचे वेतन शिक्षकांना 1 तारखेला देणे जिल्हा परिषदेला शक्य झाले आहे. रायगड जिल्ह्यात असणाऱ्या शिक्षण विभागातील पाच हजार 420 शिक्षक, 60 केंद्रप्रमुख, 14 गटशिक्षणाधिकारी यांच्या बँक खात्यात शासनाकडून आलेली वेतन तरतूद जमा करण्याच्या दिशेने रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, उप मुख्य लेख व वित्त अधिकारी महादेव टेळे यांनी पावले उचलली. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये शासकीय सुट्टी असतानादेखील 31 ऑगस्ट रोजी शिक्षकांचे वेतन बँक खात्यात जमा करण्यासाठी मान्यता देण्यात आली. यामुळे 1 सप्टेंबर रोजी शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा झाले आहे.