रेवदंड्यात गुटख्याचे साम्राज्य

| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |

अनधिकृत होलसेल गुटखा धंदेवाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन उघडपणे दहशत पसरवली आहे. त्यामुळे रेवदंड्यात गुटख्याचं साम्राज्य बिनधास्तपणे वाढत चालले आहे. त्यामुळे कायद्याचा धाक संपलाय की प्रशासनाचा मौनसंग्रह आहे, असा प्रश्न नागरिकांच्या चर्चेतून ठळकपणे पुढे येत आहे.

रेवदंड्यात गुटखा माफियाने विक्रीसाठी भन्नाट शक्कल लढवली आहे. जो कोणी गुटखा विक्री करतो त्याच्या घरीच माल पोहोचवला जातो, तर काही ठराविक टपऱ्या आणि दुकानांमध्ये गुपचूप पुड्या लपवून ठेवल्या जातात. ग्राहकांना सहजा सहजी भेटणार नाही, अशा जागी हा माल दडवला जातो. गावभर हे खेळ उघडपणे सुरू असताना, स्थानिक पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.तसेच, गावात कार्यरत असलेल्या अनधिकृत होलसेल गुटखा धंदेवाल्याने दोन सरकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून थेट गावात दहशत निर्माण केली असल्याची देखील गंभीर चर्चा सुरू आहे. गुटखा विक्रेत्यांना एवढी उघड उघड मोकळीक मिळणे म्हणजे स्थानिक यंत्रणेचे मूक सहकार्य आहे की काय, असा संशय जनतेमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची कसून चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी रेवदंड्यातील नागरिक करत आहेत.

Exit mobile version