मटका खुलेआम, तर गुटखा विक्रीसुद्धा बिनधास्त
| रेवदंडा | प्रतिनिधी |
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना ऊत आला असून, बेकायदेशीर मटका खुलेआम सुरू आहे. तसेच गुटखा विक्रीसुद्धा बिनधास्तपणे होत आहे. याविरोधात महिलावर्गातून संताप व्यक्त करण्यात येत असून, यावर तात्काळ कारवाईची मागणी होत आहे.
रेवदंडा व परिसरात बेकायदेशीर मटका सुरू असून, भ्रमणध्वनीच्या माध्यमातून भररस्त्यात मटका एजंट व्यवसाय साधून आड मार्गाला उभे राहून घेतलेल्या मटकाचे आकडे भ्रमणध्वनीद्वारेच मटका मालकांना पाठवित आहेत. एकदंरीत, भ्रमणध्वनीद्वारे मटका व्यवसायपूर्वीपेक्षा तेजीत सुरू आहे. मटका खेळून झटपट श्रीमंत होण्याच्या नादाने अनेक युवावर्ग वाममार्गाला लागले असल्याचे चित्र आहे. महिना व दिवसभरातील आर्थिक उत्पन्नाचा भाग मटका खेळून घालवीत असल्याने महिलावर्ग संप्तत प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. सदर मटका व्यवसाय पूर्णतः बंद करावेत, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. गुटखा विक्रीस पूर्णतः बंदी असतानासुद्धा रेवदंडा व परिसरात बेकायदेशीपणे गुटखा विक्री केली जात आहे. तरी, या बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांचा वचक केव्हा बसेल, असा प्रश्न महिलावर्गातून उपस्थित केला जात आहे.