| उरण | वार्ताहर |
आरोग्यास हानिकारक असल्यामुळे राज्यात गुटखाबंदी असताना उरण तालुक्यात सर्रास अवैध गुटखा विक्री सुरू आहे. परंतु, त्यावरही कळस म्हणजे सध्या गुटखा विक्रेत्या कंपन्यांनी या जीवघेण्या वस्तूची विक्री वाढवण्यासाठी विक्रेत्यांना लाखोंची बक्षिसे देऊ केली आहे. या खुलेआम विक्रीबाबत अन्न औषध प्रशासनाची ‘नजर’ मेल्याने गुटख्याचे अवैध विक्रेते ‘तलब’ होऊ शकत नसल्याचे जागरूक नागरिकांचे म्हणणे आहे.
तंबाखूजन्य पदार्थ गुटखा आरोग्यास हानिकारक असल्यामुळे त्यापासून कर्करोगासारखे गंभीर आजार होतात. या पदार्थांचे सेवन करणार्याला सावधानतेचा इशाराही गुटखा तंबाखूच्या पुड्यांवर नमूद केले जाते. तरुण पिढी नागरिक यापासून होणार्या जीवघेण्या आजारापासून वाचावे यासाठी शासनाने यावर बंदीही घातली आहे. तरीही तालुक्यासह जिल्ह्यात सर्रास गुटखा विक्री सुरू आहे. लोकशाही आघाडीच्या कार्यकाळात नागरिक कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराला बळी पडू नये म्हणून गुटखा, सुगंधित तंबाखू, खर्रा आदी वस्तूंवर कायद्याने बंदी आणली होती. परंतु, त्यानंतरही तालुक्यासह राज्यात सर्रास गुटखा विक्री सुरू आहे.
उरण शहर गुटखा विक्रीचे मुख्य केंद्र असून, बड्या व्यापार्याकडून हा गुटखा पाठवला जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे. परंतु अन्न औषध विभागाच्या अधिकार्यांना हे दिसत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. एर्टिका, अल्टो वाहनातून दिवसभरात सात ते आठ फेर्यांमध्ये पाचशे पोती गुटखा शहरात येतो.त्याचे दुचाकी अॅक्टिव्हाने शहरात व तालुक्याच्या विविध भागांत वितरण केले जाते. पोलीस अन्न, औषधी प्रशासन विभागाने गुटखा विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे सर्रास विक्री सुरू आहे. प्रत्येक चौकात पुड्या मिळतात. हे ना पोलिसांना दिसते, ना संबंधित विभागाला अशी चर्चा सर्वसामान्य जनतेत सुरू आहे.