रायगड पोलीस आरोपीच्या मागावर
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्याला गुटखा पुरविणारा गुटखामाफिया म्हसळा तालुक्यातील असून, पोलिसांच्या भीतीने तो सध्या फरार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. महाड तालुक्यातील बिरवाडी परिसरात काही दुकान चालक गुटखा विकताना सापडले होते. श्रीवर्धन तालुक्यातदेखील गुटख्याची मोठ्या प्रमाणावर अनेक वर्षे विक्री चालू असल्यामुळे या ठिकाणची तरुण पिढी व्यसनाच्या अधीन झाली होती. तसेच खेडेगावातील महिलादेखील गुटखा खात होत्या.
याबाबत श्रीवर्धन तालुक्यातील पत्रकारांनी सातत्याने आवाज उठवल्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातून गुटखा विक्री काही प्रमाणात बंद झालेली आहे. काही ठिकाणी चढ्या भावाने व अतिशय गुप्तपणे विक्री केली जात असल्याचे बोलले जात आहे. महाड एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिरवाडी गावाच्या परिसरामध्ये काही दुकानदार गुटखा विक्री करत असल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता गुटखा विक्री करणारे व्यापारी आढळून आले.
त्यांच्याकडून गुटखादेखील हस्तगत करण्यात आल्याची बातमी होती. सदर व्यापारांनी म्हसळा येथील एक मोठा व्यापारी आम्हाला गुटखा पुरवतो, असे सांगितले. सदर व्यापाऱ्याचे पोलिसांना नाव सांगितल्यानंतर पोलिसांच्या भीतीने सदर गुटखामाफिया फरार झाला आहे. रायगड पोलिसांचे विशेष पथक त्याचा कसून शोध घेत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्णपणे गुटखाबंदी असल्याने गुटख्याचे उत्पादनदेखील पूर्णपणे बंद आहे. परंतु शेजारील कर्नाटक राज्यामध्ये गुटख्याचे उत्पादन सुरू आहे.
सदरचा गुटखामाफिया कर्नाटक राज्यातून खूप मोठ्या प्रमाणावरती गुटखा आणून म्हसळा येथील आपल्या गोदामामध्ये ठेवत असे. त्या ठिकाणाहून सदरचा गुटखा श्रीवर्धन, म्हसळा, तळा, रोहा, माणगाव,मुरुड, महाड, पोलादपूर इत्यादी सर्व ठिकाणी पुरविला जात असे. आजपर्यंत अनेक वेळा पोलिसांनी गुटखा पकडण्यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांकडे छापेमारी केली. परंतु, स्थानिक व्यापाऱ्यांकडून गुटखा माफिया कोण आहे? याबाबत माहिती पोलिसांना मिळाली नव्हती.
परंतु रायगडच्या पोलीस अधीक्षक यांनी अशा प्रकारे काळे धंदे करणाऱ्या वरती कडक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिल्यामुळे चरस, गांजा, गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. श्रीवर्धन शहरात देखील परराज्यातून आलेले काही व्यापारी टोबॅको स्टोअर्सच्या नावाखाली गुटख्याची सर्रासपणे विक्री करत होते. परंतु सध्या गुटखा विक्री करणारा माफीया गायब झाल्यामुळे गुटखा विक्रीचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. अंमली पदार्थ व गुटख्यासारख्या घातक तंबाखूजन्य पदार्था वरती रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी धडक कारवाई केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
