कसारा घाटात गुटखा हस्तगत

। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबई-नाशिक महामार्गाच्या लगत कसारा घाट परिसरातील घाटनदेवी मंदिर शिवारात घोटी केंद्र पोलिसांनी अंदाजे 25 ते 30 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या गुटख्याची किंमत अंदाजे 25 ते 30 लाख रुपयांच्या घरात आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्ग घोटी केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांना दूरध्वनीवरून लाखो रुपयांचा गुटखा बेवारस स्थितीत पडल्याची माहिती त्यांच्या विश्‍वनीय सुत्रांकडून कळली होती. यानंतर वालझाडे यांनी तातडीने आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत समक्ष पाहणी करून दिलेली खबर पक्की असल्याची खात्री केली. तसेच यानंतर त्यांनी इगतपुरी पोलीस ठाण्याला ही खबर कळविली.
पोलीस तपासणीत, पांढर्‍या रंगाच्या 33 पोत्यामध्ये हा गुटखा होता. महामार्ग पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे, जितेंद्र पाटोळे, राम वारुंगसे, जगदीश जाधव आणि इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी संपूर्ण गुटखा ताब्यात घेत अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून मोजमाप झाल्यावर या गुटख्याची किंमत वाढू शकते, असा अंदाज आहे.
दरम्यान, दुर्गम माळरानावर संबंधित गुटख्याची उलाढाल व ने-आण कोण करीत आहे, याबाबत इगतपुरी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. महामार्ग पोलिसांनी सराईत गुन्हेगारी वृत्तीच्या इसमाच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद करण्याची मोहीम सुरू केली आहे.

Exit mobile version