| पनवेल । वार्ताहर ।
पोलिसांनी गुजरातहून नवी मुंबईत गुटखा आणून विकणार्या टोळीवर कारवाई करीत एकूण 61 लाख 80 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
रविवारी महापे चेक पोस्ट येथे सकाळी साडेसातच्या सुमारास तुर्भे पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान संशयित टेम्पो थांबवून तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र शासनाने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला मिळून आला होता. 11 लाख 96 हजार 800 किंमतीचा केसरयुक्त विमल पान मसाला गुटख्याच्या 30 मोठ्या गोण्या व 6 लाखांचा टेम्पो असा एकूण 17 लाख 9 हजार, 800 रुपयांचा ऐवज यावेळी जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान घेण्यात आलेला गुटखा हा डोंबिवली परिसरात राहणारे आरोपी हे गुजरात येथून कंटेनरद्वारे मागवून त्याची ठाणे, नवी मुंबई, मुंबई व परिसरात वितरण करतात, अशी तपासात माहिती समोर आली. तसेच अजूनही मोठ्या प्रमाणात गुटखा येणार असल्याची माहिती अटक आरोपींकडून मिळाली.
हा माल दोन वेगवेगळ्या गाड्यांमध्ये असल्याचे समोर येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी तात्काळ पावले उचलत दोन वेगवेगळे पथक पाठवले. बुधवारी तुर्भे पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने डोंबिवली परिसरातील काऊन, पलावा सिटी येथून गुटखा व पान मसाल्याने भरलेला टेम्पो (एमएच 05 डीके 7829) व मानपाडा एमआयडीसीमधील पिंपळेश्वर मंदिराच्या जवळून आयशर कंटेनर टेम्पो (जीजे 01 केटी 1133) हा गुटखा व पान मसाल्यासह ताब्यात घेतला. या कारवाईत 61 लाख 80 हजार रुपयांचा गुटखा, तर टेम्पो किमती अंदाजी 20 लाख, असा माल जप्त करण्यात आला आहे. तसेच यात एकूण 3 जणांना अटक करण्यात आली असून वितरक, माल वाहतूक करणारा आणि विकत घेणार्याचा त्यात समावेश आहे.