दीड लाखांचा गुटखा साठा जप्त

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पनवेल शहर पोलिसांनी आपल्या हद्दीत ऑलआऊट व कोंबिंग ऑपरेशन सुरू केले आहे. त्यानुसार मध्यरात्री पोलिसांनी पनवेल शहरातील उरण नाका येथे लावलेल्या नाकाबंदी दरम्यान कारमध्ये लपवून नेला जाणारा 1 लाख 56 हजार रुपये किमतीचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांची कार देखील जप्त केली आहे.

पनवेल शहर पोलिसांनी त्यांच्या हद्दीत ऑलआऊट व कोंबिंग ऑपरेशन सुरू केली आहेत. त्यानुसार पोलिसांनी शहरातील उरण नाका येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली होती. दरम्यान, मध्यरात्री पनवेल येथून करंजाडेच्या दिशेने जाणारी कार पोलिसांनी तपासणी केली असता त्यात कारच्या मागील सीटवर असलेल्या खाकी रंगाच्या खोक्यात रजनीगंधा सुगंधित पानमसाला, तसेच एका पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये तुलसी रॉयल जाफरानी जर्दा मिळाला. तसेच, या कारच्या डिक्कीमध्ये 7 गोण्यांमध्ये बाजीराव सुगंधी पानमसाला, मस्तानी 216 प्रीमियर च्युइंग टोबॅको असा 1 लाख 56 हजार रुपये किंमतीचा गुटखा व सुगंधित पानमसाल्याचा साठा आढळून आला. त्यावर पोलिसांनी कारमधील मनीष गोविंद कुमार (45) व संदीप रामकरण निशाद ऊर्फ संजू या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे या गुटख्याबाबत चौकशी केली. त्यांनी हा गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्यांनी हा प्रतिबंधित गुटखा नेमका कुठून आणण्यात आला आणि त्यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे, याचा तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत

Exit mobile version