अलिबाग पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
बंदी असताना खुलेआमपणे गुटख्याचा साठा बंद घरात ठेवण्यात आला होता. अलिबाग पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी (दि.2) सकाळी संयुक्तरित्या कारवाई केली. या कारवाईत 1 लाख 31 हजार 361 रुपयांच्या गुटख्याचा साठा आढळून आला. ही कारवाई अलिबागमधील संगम येथे करण्यात आली आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबागमधील ही सर्वात मोठी कारवाई आहे. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संगममध्ये बेकायदेशीररित्या गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थांचा साठा असल्याची माहिती अलिबाग पोलिसांना मिळाली. अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांच्यासह त्यांचे पथक तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गुरुवारी (दि.2) सकाळी संयुक्तरित्या छापा टाकला. एका बंद घरात गुटख्याचा साठा आढळून आला. त्यामध्ये प्रिमिअम रजनीगंधा पान मसाला, केशरमिश्रित विमल पान मसाला, सुगंधीत तंबाखू आदी साठ्यांचा समावेश आहे. सकाळपासून सुरु झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती. मुद्देमालाच्या मोजदादीबरोबरच अंतिम पंचनामा सुरु होता. अखेर एक लाख 31 हजार 361 रुपयांचा साठा जप्त करून रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईनंतर जिल्ह्यातील इतर भागांमधील गुटखा विक्रेते आणि साठे बाजारांमध्ये खळबळ उडाली आहे.







