दहा लाखांचा गुटखा जप्त

| पनवेल | वार्ताहर |

तळोजा औद्याोगिक वसाहतीलगत असणार्‍या घोट गावामध्ये पोलिसांनी घातलेल्या छाप्यात एका खोलीत तब्बल 10 लाख 27 हजार रुपयांचा गुटखा व पानमसाला जप्त केला. मोहम्मद खालीद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे अन्वेषण युनिट क्रमांक 2 च्या पथकाला घोट गावातील रामू पाटील यांच्या खोलीमध्ये संशयास्पद वस्तूची साठवणूक करत असल्याची माहिती मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्या पथकाने या परिसरात टेहळणी केल्यानंतर त्यांनाही संशयास्पद हालचाली दिसल्या. मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी रामू पाटील यांच्या चाळीमध्ये धाड घातल्यानंतर एका खोलीत फिनेस्ट, पारस, मुसाफीर, सुप्रीम वरानसी आशिक, पुकार, कॅश गोल्ड या पान मसाल्यासह टोबॅकोची पुडी, एम फोन न्यू पॅक रॉयल जाफरानी जर्दा, राज कोल्हापूरी, पुकार च्युविंग तंबाखू, व्ही.सी. 5 च्युविंग टोबॅकोच्या पुड्या सापडल्या. याप्रकरणी पोलिसांनी तळोजा फेस 1 येथील हिना हाईट या इमारतीमध्ये राहणार्‍या 25 वर्षीय मोहम्मद आबीद मोहम्मद खालीद याला अटक केली आहे. काही दिवसांपासून मोहम्मद हा रामू यांची खोली भाड्याने घेऊन त्यामध्ये अवैध व्यवसाय करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

Exit mobile version