एकाला अटक, दुसरा आरोपी फरार
। पनवेल । प्रतिनिधी ।
कळंबोली सेक्टर-2 मधील एलयूएजी-2, श्री अपार्टमेंट परिसरातील एका बंद खोलीत साठवून ठेवलेला प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा कळंबोली पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने जप्त केला. या कारवाईत नऊ लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, परशुराम भूदेव गुप्ता याला अटक करण्यात आली आहे. तर त्याचा साथीदार रोहित परशुराम गुप्ता हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एलयूएजी-2 परिसरातील एका बंद खोलीबाबत पोलिसांना संशय आला. पोलिसांनी खोलीची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली. अन्नसुरक्षा अधिकारी अंकिता रमेश गाडवे यांच्या पथकाने पाहणी करून साठ्याची तपासणी केली. पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांसह एकूण नऊ लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी परशुराम भूदेव गुप्ता याला अटक करण्यात आली असून, रोहित गुप्ता याचा शोध सुरू आहे. पुढील तपास कळंबोली पोलीस करीत आहेत.







