उरण पोलीस ॲक्शन मोडवर
। उरण । प्रतिनिधी ।
उरणमध्ये बुधवारी (दि.१०) रात्री खरकट पाणी अंगावर फेकल्याच्या मुद्यावरून परप्रांतीय जमावाकडून पती, पत्नी आणि त्यांच्या सात वर्षीय मुलीवर लाट्या काट्याबरोबर सशस्त्र हल्ला चढवला होता. यावेळी जाब विचारणाऱ्या रुपेश भोईर यांच्यासह आणखी चार स्कूटरचे नुकसान करून, या परप्रांतीय जमावाकडून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याबाबत उरण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करून यातील तेरा परप्रांतीय जणांना अटक करण्यात आली आहे. तर आरोपी रहात असलेले ठिकाण सिडकोच्या माध्यमातून उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांनी जमीनदोस्त केले आहे. तसेच द्रोणागिरी विभागातील अन्य बेकायदेशीर टपऱ्या देखील नष्ट करण्याची कारवाई पोलीस आणि सिडकोने संयुक्तरित्या केली आहे. अशाप्रकारची उरणमध्ये करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे. पोलीस व सिडकोच्या धडाकेबाज कारवाई बदल मनसेचे तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांनी पोलीस व सिडकोचे अभिनंदन केलं तसेच सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, अशा प्रकारची कारवाई नियमित व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
उरणच्या द्रोणागिरी नोडमधील सेक्टर ५० मध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या रुपेश भोईर याच्या अंगावर खरकटं फेकल्याचा जाब विचारताच, परप्रांतीय जमावाकडून लाठ्याकाठ्यांसह हल्ला चढवण्यात आल्याची घटना उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी घडली. यामध्ये मारहाण होताच रुपेश भोईर यांनी तेथून आपली पत्नी आणि पाच वर्षीय मुलीसह बाजूला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र या जमावाने आपला आतंक दाखवण्यासाठी व परिसरात दहशत निर्माण करण्याच्या दृष्टीने रुपेश भोईर यांच्या स्कुटरवर हल्ला चढवला. यामध्ये स्कूटरचे मोठे नुकसान झाले आहे. तर रुपेश भोईर यांना देखील दुःखापत झाली आहे. याबाबत उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. उरण तालुक्यात येणाऱ्या परप्रांतीय नागरिकांनी या अगोदर ही स्थानिकांवर शस्त्र हल्ले करुन आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र स्थानिक पुढाऱ्यांच्या वरदहस्तामुळे परप्रांतीय नागरिक आपला बचाव करत आहे.
मात्र बुधवारी उरणमध्ये घडलेल्या घटनेचे तीव्र पडसाद स्थानिकांच्या मनात उमटू लागल्याने या घटनेचा निषेध व्यक्त करत परप्रांतीय नागरिकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसे व स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली. या मागणीची दखल उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांनी घेऊन आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली १३ परप्रांतीय आरोपींना अटक केली आहे. तसेच या हल्ल्यानंतर अनाधिकृत व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय नागरिकांच्या टपऱ्या व पत्र्याच्या शेडवर बुलडोजरची कारवाई सिडकोच्या माध्यमातून केली आहे. पोलीस व सिडकोच्या या कारवाईचे नागरिकांनी व उरण मनसेकडूनही स्वागत करण्यात आले आहे.







