महामार्गाच्या चुकीच्या कामाचा फटका
। नागोठणे । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे परिसरात कोकणात जाणारी तीन वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाला. या अपघातात तीनही वाहनांचे थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामुळे महामार्गावर महाड बाजूकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. ही घटना शनिवारी (दि.12) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
नागोठणे हद्दीतील हॉटेल रुची समोर एका ठिकाणी महाड बाजूकडे जाणाऱ्या मार्गीकेवरील डायव्हरजनच्या ठिकाणी दोन जॉईंटवर रस्ता समपातळीत तयार न करता खाली–वर तयार केला आहे. त्यामुळे पुढील वाहनाने ब्रेक मारल्यामुळे ही तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने किरकोळ अपघात घडून ही वाहतूक कोंडी झाली. काही वेळातच पोलीस व वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
अपूर्ण अवस्थेतील मुंबई-गोवा महामार्गावरून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणकरांची वाट बिकट झाली असून, प्रवाशांना तासनतास एकाच जागेवर खोळंबून राहावे लागत आहे. सणासुदीच्या काळात चाकरमान्यांचा प्रवास अत्यंत खडतर आणि मनस्ताप देणारा ठरत आहे.






