पोलिसांनी पाठलाग करुन चालकाची केली धरपकड; 6 जण ताब्यात, 2 जण फरार
। रोहा । प्रतिनिधी ।
ऑल आऊट ऑपरेशन अंतर्गत कुंडलिका पुलाशेजारी असलेल्या हॉटेल रोहा प्राईड येथे नाकाबंदीकरिता नेमण्यात आलेल्या पोलिसांनी मध्यरात्री एका संशयस्पद पीकअप टेम्पोचालकाला चौकशीकरिता थांबण्यास सांगितले. मात्र, पीकअप टेम्पो चालकाने गाडी न थांबविता पसार झाला. त्यानंतर सुरु झालेल्या थरारनाट्यात पोलिसांनी पाठलाग करुन चालकाची धरपकड केली. या कारवाईत पोलिसांनी दोन लाख 65 हजार रुपये किंमतीचा टेम्पोभर मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी 6 जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आहे. तर अन्य 2 जण अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, ऐन गणेशोत्सवात पोलिसांनी गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्याने रोहा पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आरोपी रोशन सुभाष पैर (रा.चंद्रदर्शन रेसिडन्सी रोहा) हा मध्यरात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील टेम्पो (क्र.एमएच 06 बी जी 4505) नागोठणे बाजूकडून रोहा बाजूकडे घेऊन येत होता. यावेळी हॉटेल रोहा प्राईड या ठिकाणी नाकाबंदी करित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना संशय आल्याने वाहन चालकाला वाहन थांबविण्याचा इशारा केला. परंतु, त्याने वाहन न थांबविता बायपास रोडने वेगात वाहन चणेरा बाजूस घेऊन पळून गेला. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बाळावला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन गाडी थांबवली. मध्यरात्री झालेल्या या थरारनाट्यानंतर गाडीत काय आहे? याबाबत पोलिसांकडून विचारपूस केली असता टेम्पो चालकाकडून असमाधानकारक उत्तर मिळाले. त्यामुळे पोलिसांनी गाडीच्या पाठीमागील दरवाजा उघडून पाहिले असता टेम्पोत लाखों रुपये किंमतीचा बेकायदेशीर केसरयुक्त विमल पान मसाला, व्ही वन तंबाखू, तुलसी पान मसाला आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी 2 लाख 64 हजार 380 रु. किंमतीचा साहित्य जप्त करुन टेम्पोचालकाला अटक केली.
रोहा पोलीस ठाण्यात 2024 साली गुन्हा दाखल असलेल्या आरोपी रोशन पैर याच्याकडून जप्त केलेला बेकायदेशीर गुटख्याविषयी अधिक माहिती घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केले असता त्याने माहिती देण्यास टाळाटाळ केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच चालकाने म्हसळा येथील सुनिल कोकचा व नजीर मेमन या दोन मुख्य डीलरचे नाव सांगितले. त्यानंतर रोहे शहरातील 5 पान टपरी चालकांना हा बेकायदेशीर गुटखा सप्लाय केला जात होता. त्यामुळे पोलिसांनी त्या 5 पान टपरी चालकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली.
त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कस्टडी सुनावल्यानंतर त्यांना अलिबाग कारगृहात त्यांची रवानगी करण्यात आली. टेम्पोचालकसहित 5 पान टपरी धारकांना अटक केली असून म्हसळा येथील दोन गुटखा माफिया अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक सलमान खतीब करीत आहेत.
