गटारीची पार्टी जीवावर बेतली! एकाचा मृत्यू ; एक जण बेपत्ता

| नाशिक | वृत्तसंस्था |

श्रावण महिना सुरु होण्याआधी गटारी साजरी करण्याच्या उद्देशाने तानसा धरणाखाली पाच मित्र कारमध्ये बसून पार्टीचा आनंद लुटत असताना, अचानक तानसा धरणाचे दरवाजे विसर्गासाठी उघडण्यात आल्याने कारसह पाचजण तानसा नदीपात्रात वाहून गेले. त्यातील तिघांनी गाडीबाहेर उड्या मारल्याने बचावले. उर्वरित दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध घेण्याचे कार्य सुरु आहे.

शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात कल्याण-मुंबई वरून गटारी साजरी करण्यासाठी पाच जण आले होते. तानसा धरणाच्या गेट नंबर एकच्या खाली गाडीत बसून दुपारी गटारीची पार्टी करीत होते. त्यांच्या ध्यानीमनी नसताना तानसा धरणातील पाण्याच्या विसर्गासाठी अकस्मात स्वयंचलित 24 दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झाला. बघता बघता गाडी तानसा नदीच्या प्रवाहात वाहून गेली. त्यातील तिघांनी गाडीतून बाहेर उड्या घेतल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र दोघेजण गाडीतच अडकल्याने ते प्रवाहात वाहून गेले. यात गणपत चिमाजी शेलकंदे रा. कल्याण याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला आहे. मात्र एकजण अद्यापही बेपत्ता असून त्याचे शोधकार्य सुरू आहे.

Exit mobile version