। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील नाडसुर केंद्राचे सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धा राजिप पाच्छापूर शाळेत नुकत्याच संपन्न झाल्या. यावेळी ‘माझा नवा उपक्रम’ अंतर्गत पाच्छापूर शाळेच्या ‘ज्ञान साधना’ या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्रप्रमुख कल्पना पाटील, मुख्याध्यापक अनिल राणे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सदस्य, शाळेतील शिक्षक जनार्दन भिलारे, कमलाकर तांडेल, रमेश पवार व धनाजी कोपनर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या आकर्षक, सचित्र व माहितीपूर्ण हस्तलिखितामध्ये विद्यार्थ्यांनी स्वरचित केलेल्या कविता, प्रार्थना व लेखांचादेखील समावेश केला आहे.
गटविकास अधिकारी विजय यादव व गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास यांच्या प्रेरणेने व केंद्रप्रमुख कल्पना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाच्छपूर शाळेतील विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या सहकार्याने मुख्याध्यापक अनिल राणे व शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी हे आकर्षक व माहितीपूर्ण हस्तलिखित तयार केले आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश वारंगे व सदस्य, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थीत होते. कार्यक्रम छायाचित्रण व संकलन गोरख आघाव यांनी केले.
सुप्त कलागुणांना वाव
विद्यार्थ्याच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक व नाट्यीकरण स्पर्धा, मराठी, गणित, इंग्रजी या विषयाच्या मूलभूत कौशल्यावर आधारित प्रश्न देऊन स्पर्धा घेण्यात आल्या.
हस्तलिखिताचे वैशिष्ट्य
ज्ञान साधना या हस्तलिखितात तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, विद्यार्थ्यांना शाळेप्रती वाटणारा जिव्हाळा आणि विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यात आला आहे. हस्तलिखितामध्ये ताणतणावांचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत माहिती आहे. तसेच शाळेत वर्षभर राबविलेले उपक्रम, शाळा बंद पण शिक्षण सुरू आदी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. विविध शब्द खेळ व विषयनारूप माहीती आदींचा सचित्र समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळण्यासाठी हस्तलिखित एक प्रभावी साधन आहे.
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व सृजशीलतेला वाव देणे आणि नवनिर्मितीचा आनंद मिळवणे हा मुख्य हेतू घेऊन ज्ञान साधना या हस्तलिखिताची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या हस्तलिखित मध्ये विदयार्थी, शिक्षक यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांनी सुद्धा नवनिर्मितीचा आनंद घेतला आहे.
अनिल राणे, मुख्याध्यापक, पाच्छापूर
