माणगाव नगराध्यक्षपदी ज्ञानदेव पवार, तर उपनगराध्यक्षपदी सचिन बोंबले

। माणगाव । वार्ताहर ।
संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माणगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत माणगाव विकास आघाडीने सत्ता प्रस्थापित केल्यानंतर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी गुरुवार, दि.10 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी माणगाव विकास आघाडीचे शिवसेनेचे ज्ञानदेव मारुती पवार, तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे सचिन मारुती बोंबले हे विराजमान होऊन माणगाव नगरपंचायतीवर शिवसेनाच भगवा फडकला आहे.
या निवडणुकीत नगरपंचायतीच्या एकूण 17 जागांपैकी 9 जागांवर माणगाव विकास आघाडीचे नगरसेवक तर 8 जागांवर राष्ट्रवादी-शेकाप आघाडीचे नगरसेवक निवडून आले.त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी माणगाव विकास आघाडीतर्फे शिवसेनेचे ज्ञानदेव पवार व राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप आघाडीतर्फे आनंद यादव व रिया उभारे निवडणूक रिंगणात होते. तर, उपनगराध्यक्ष पदासाठी माणगाव विकास आघाडीतर्फे शिवसेनेचे दुसर्‍यांदा नगरपंचायतीवर निवडूण आलेले सचिन बोंबले तर राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप आघाडीतर्फे शेकापच्या ममता कुंडलिक थोरे या निवडणूक रिंगणात होत्या. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी बोट वर करून उघड मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत पीठासन अधिकारी म्हणून भूसंपादन काळप्रकल्प माणगाव उपजिल्हाधिकारी नितीन राऊत व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी काम पहिले. नगराध्यक्षपदी शिवसेनेचे ज्ञानदेव पवार व उपनगराध्यक्षपदी सचिन बोंबले निवडूण येताच माणगावात नगरपंचायत कार्यालयाबाहेर उपस्थित माणगाव विकास आघाडीच्या कार्यकत्यांनी एकच जल्लोष केला.

Exit mobile version