हाफिझ तल्हा सईद केंद्र सरकारद्वारे दहशतवादी घोषित

। मुंबई । वृत्तसंस्था ।
लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा एक प्रमुख नेता आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईद याचा मुलगा हाफिझ तल्हा सईद याला केंद्र सरकारने दहशतवादी घोषित केले आहे. हाफिझ तल्हा सईद (४६) याचा लष्कर-ए-तैयबातर्फे भरती, पैसा गोळा करणे, तसेच भारतात हल्ल्यांची योजना आखून ती अमलात आणणे यात सक्रिय सहभाग आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने एका अधिसूचनेत म्हटले आहे. हाफिझने लष्कर-ए-तैयबाच्या पाकिस्तानातील विविध केंद्रांना भेटी दिल्या असून, आपल्या धार्मिक प्रवचनात तो भारत, इस्रायल, अमेरिका व इतर पाश्चिमात्य देशांतील भारतीय हितसंबंधियांविरुद्ध जिहादचा प्रचार करत असतो, असेही मंत्रालयाने सांगितले आहे.
हाफिझ तल्हा सईदचा दहशतवादात सहभाग असल्याने त्याला बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये दहशतवादी अधिसूचित करणे आवश्यक आहे. त्यानुसार त्याला या कठोर कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित करण्यात येत असल्याचे अधिसूचनेत नमूद केले आहे. अशारीतीने सरकारतर्फे वैयक्तिक दहशतवादी घोषित केलेला हाफिझ तल्हा सईद हा ३२ वा आहे. तो पाकिस्तानातील लाहोरचा रहिवासी आहे. तो लष्करचा वरिष्ठ नेता असून, या संघटनेच्या मौलवी विभागाचा प्रमुख आहे.

Exit mobile version